रामाची साळा
सकाळच आट-नव वाजलं असतील. कालच मिरगाचा पाणी पडुन गेल्ता. समदीक भोय भिजुन गेल्ती. ल्वाकानी औता धरली व्हती उखळणीला.
आमचय सर्जा राजा दरीला नेलं व्हतं.
माहा बाप आन माहा भाव सरजाम घेऊन गल्त. मफला दुसरा भाव जुकाड, जोत्या, मोरक्या अन शिवळाटा घेऊन गेल्ता.
मफल्याला त्याचा काय द्याना घ्याना नवता. म्या आपला चार पाच गडी ग्वाळा क्यलं अन निगालो खाचरातुन धसकं खेळाया ( धसकं म्हणजे एक काठी टोकदार करुन नंतर ती मऊ जागेवर मारायची खाली पडली तर हारलो.)
हा त आमी असवलेचा नाम्या, सुपेचा संत्या, लांघ्यांचा होन्या अन मी समद जमलो. मागुन सातपुतेचा संदिप, लोखंडेचा सुन्या, गिटा ( धर्मा सातपुते) यानार व्हते.
आम्या ख्याळाया सुरवात क्यली. म्या त पकी राज्य नाम्याव रफळवली. पार सोनचरीक ग्यलो. मफला अंदाज एकदम भारी अन माहा नेम खंगरी म्हणलेव धसका पडायचाच नाय. अन त्यात धसका करपाचा. कालच आयच्या बिनदेखत कोयती चोरुन ममतीच्या वंदाकुन काठी आणुन धसका केल्ता.
अन तुमाली काय सांगू धसका करताना मफल्या हाताव लागला ना कोयता.
हात पार रगताना माखुन. पण मी पठ्या पका हुशार. लगेच फांगुळीचा पाला चोळला आन रस हाताव लावला. मग काय कोणाची बीशात वळखयची, हाताव लागला का नाय.
हा त सोनचरीक धसकेची राज्य गेली व्हती. तेवड्यात माह्या आयना हाक मारली ” बा रामा, उडी मारीत घरी ये.”
पोरानली म्हणला तुमी ख्याळा मी जातो. माह्या मागच संत्यालाही तेच्या आयना हाक मारली. त्यो पण आला.
घरात याताच आय म्हंगाली बा तुला आज साळंत जाया लागंल. मफल्याला कह्येची साळा माहीत. पाच सा वरशाचा आसल. हा तेवडा सुकडा खाया मातर बालवाडीत जायचो.
म्या म्हणला आय कुणीक साळत. आय म्हंगाली आसाण्याला आसरम साळत.
माही पिशवी भरलीच व्हती. आता पिशवी म्हंजी काय , लिलावाचा एक हाफ चडी अन मिरकुटलेला शर्ट.
मंग मी अन संत्या, आन तेची आय अन माही आय निगालो
पाणी पडतच व्हता. मफल्याला कागदाचा घोंगता. वर फक्त दिसाया बिलेटना फाडला व्हता. त्यामुळ तेचेतुन पाणी काय पाण्याचा बापय आत यणार नाय. माह्या आयक घोंगडीचा घोंगता.
आमी पायीच निगालो. माह्या पायात नाय वहाना का काय नाय. पिपारगण्याकुन वर डोणीच्या डोंगराव गेलो.मफल्याला पोटाला पकी भुक लागली. माह्या आयना सायेची भाकर आन लसनाची मिरची आनली व्हती. याक द्वान घास खालं आन मफल्याला ठसका ग्याला. तिथच झुरीव पानी पेलो. मग वजवज निगालो. तिरपाडीतुन पुडं बोनावड्यातुन ( जंगलाचे नाव) गेलो. ल्वाका म्हंगाली बोनावड्यात भुता आह्यात पण मफल्याला गड्या नाय दिसली.
मग जांभळेवाडीतुन आसाण्याला पोचलो. माह्या आयना आन संतेच्या आयना अध्यक्ष सरानली भेटुन मफल्याला पेटी आन बिलांकिट घ्यातला.
आमी शेडमधी बसलो व्हतो. माही आय मला सांगत व्हती बा ढस्या डोहाकं जाव नको,मास्तर सांगतील त्या नीट ऐक.
तेवढ्यात आमची नजार संत्याक गेली. तेच्या आयना तेच्या हातात आठ आणेच पाच ठोकळ दिलं व्हतं. तेच्यातुन यक खाली पडला अन खाणकन आवाज आल म्हणुन आम्या तिकडं पाह्यला.
माह्या आयना पाहुन नाय पायल्या सारखा क्याला. पण आयच डोळ मातर पाण्याना भरलं. आयक मला दिया पयस नवतं. पदराना डोळ पुसीत आय म्हंगाली ” बा मजेत राह्ये ”
म्या मनातल्या मनात म्हणला ” आय मजेत राहाना आपल्या मनाव अवलंबून हाये, आपल्याक किती पयस हायेत ह्यावर नाय”
माही आय डोळ पुसीत पाटमोरी व्हवुन गेली, आन मी बंडीना डोळ पुसीत पेटीव बसलो.
रामदास लोखंडे
आहुपे, पुणे
८०९७६२९०२८