Thursday, December 12, 2024
Homeराजकारणराज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ. वाचा सविस्तर

राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजीव सातव, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेना पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी अशा एकूण ६ सदस्यांनी आज राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. पवार आणि आठवले यांनी दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.  

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नवनिर्वाचित सदस्यांनी सामाजिक अंतर पाळून शपथ घेतली. या सदस्यांना आपल्या सोबत  केवळ एक अतिथी आणण्याची परवानगी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य फौजिया खान यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या शपथविधीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्या सदस्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही त्यांचा शपथविधी पुढील संसद अधिवेशन काळात होईल.

महाराष्ट्रातील सहा सदस्यांसह देशभरातील अन्य नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनीही शपथ घेतली यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही आज शपथ घेतली. राज्यसभेच्या १९ जागांसाठी जूनमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या.

संबंधित लेख

लोकप्रिय