Thursday, December 12, 2024
HomeNewsबोगस विरुद्ध खरे आदिवासी - संदिप मरभळ.

बोगस विरुद्ध खरे आदिवासी – संदिप मरभळ.

अलीकडे ३ -४ वर्ष झाली बोगस आदिवासी विरुद्ध खरे आदिवासी हा संघर्ष जोरात सुरु झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासी जमाती मध्ये जी वर्षानुवर्षे घुसखोरी झाली आहे आणि काही बोगस प्रमाणपत्राच्या आधारे ख-या आदिवासी समाज्याच्या सोई सुविधा लुबाडत आहेत, तसेच काही समाज तर आता आम्ही पण आदिवासी आहोत आणि आम्हाला आदिवासी जमातीत आरक्षण द्या यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतांना दिसून येते आहेत. त्याच प्रमाणे काही तर यांच आरक्षणच बंद झालं पाहिजे, अशी भुमिका घेणारे पण दिसुन येत आहेत. काही राजकीय पक्ष तर दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत, काहींनी तर आदिवासी जमातीत इतर समाजाला सामाविष्ट केलं पाहिजे अशी भुमिका घेतली. मग त्यामध्ये सर्व पक्ष आले, फक्त एक सोडून त्याचं नाव कम्युनिस्ट पक्ष याचं पक्षाने जाहीर आदिवासी समाज ची भुमिका घेतली आणि आझाद मैदान, मुंबई येथे मोर्चा काढून सांगितलं की आदिवासी समाजात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली.

 

३-४ वर्षापूर्वी सुद्धा आदिवासी समाजात घुसखोरी झाली होती आणि आज देखील घुसखोरी केली जात आहे. परंतु आज पर्यंत यावर कोणी आवाज का उठवला नाही? तर या प्रश्नाचे उत्तर माझ्या मते आमच्या समाजातील अज्ञानता म्हणावे अथवा याकडे कोणाच लक्ष गेलं नसेल आणि जरी लक्ष दिले असेल तरी त्याचे जास्त परिणाम झाले नाही. मग असा प्रश्न पडतो की अलीकडे बोगस आदिवासी विरुद्ध खरे आदिवासी हा संघर्ष सुरू झालाच कसा? 

तर तो असा की अलीकडे अनेक आदिवासी संघटना निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक संघटनांनी आपली भुमिका कट्टर स्वरूपात तर काहींनी आपली भुमिका मवाळ पद्धतीने घेतल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ असा होत नाही की आधी आदिवासी संघटना नव्हत्या होत्या. परंतु त्यांनी फक्त आदिवासी समाजातील रोजच्या जीवनातील प्रश्नांवरच काम केले म्हणजेच भाकरीची लढाई लढली. परंतु आज ज्या संघटना निर्माण झाल्या त्यांनी आपली लढाई संस्कृती जपण्याची लढाई आहे, म्हणून ते लढत आहेत. 

कारण प्रत्येक संघटनेचा काम करण्याचा अजेंडा वेगवेगळा असतो. परंतु खरा प्रश्न आहे (भाकरी आधी की संस्कृती ) तर माझ्या मते ‘भाकरी आधी’. याचा अर्थ असा होत नाही की मी संस्कृती विरोधी आहे, तर नाही. माझ्या मते भाकरी आणि संस्कृती यांना सोबतच घेऊन लढाई लढली पाहिजे, परंतु अस होताना दिसून येत नाही. काहीच संघटना अश्या आहेत, त्या भाकरी आणि संस्कृती यासाठी लढाई लढत आहेत.

आपण म्हणण्यापेक्षा माझा आदिवासी समाज बोगस आदिवासीच्या नावाखाली इतर समाजाशी वैर तर निर्माण करून घेत नाही ना? तर माझ्या मते वैर निर्माण करून घेत आहे. याला जबाबदार फक्त आणि फक्त आमच्या समाजातील स्वतः ला नोकरदार म्हणून घेणारे आहेत. त्यामध्ये सर्वच येत नाही, परंतु काही लोक आहेत. त्यांना फक्त आदिवासी माणूस पाहिजे मग तो व्हाट्सएप ग्रुपमध्ये किंवा आदिवासी समाजातील कार्यक्रमांमध्ये. त्यांना बिगर आदिवासी लोक चालत नाहीत, हे अर्ध सत्य आहे. खरं तर त्यांना बिगर आदिवासी लोक चालतात फक्त विशिष्ट संघटनेतील चालत नाही? आणि त्यामुळे हे नोकरदार इतर समाजातील लोकांबद्दल आदिवासी विद्यार्थ्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहेत. 

आता एक विद्यार्थी म्हणून आपण गैरसमज होऊन द्यायचा की वास्तव परिस्थिती समजून घ्यायची तर आपण कोणाचेही अंध भक्त होण्यापेक्षा सत्य परिस्थिती समजून घेतली पाहिजे. खरंच आपण बिगर आदिवासी लोकांचा विरोध करायचा का? तर नाही. का ? तर ही आदिवासी संस्कृती नाही. आदिवासी संस्कृतीनुसार कोणत्याही समाजाचा विरोध करत नाही. उलट आज देखील आपण आदिवासी भागात गेला, तर तुम्हाला न सांगता पाणी आणि जेवण केल्या शिवाय जावून देत नाही. मग तो कोणत्या जातीचा आहे किंवा धर्माचा हे कधीच आदिवासी विचारत नाही. परंतु माझा मध्यमवर्गीय आदिवासी आज हेच विचारताना दिसतो आहे, याचा अर्थ असा नाही की कोणी आपल्यात घुसखोरी करीन आणि आपण त्याचा विरोध करायचा नाही विरोध करायचा? पण कोणाचा ? तर बिगर आदिवासी माणसांचा नाही. तर जे बिगर आदिवासी जमातीची प्रमाणपत्र घेऊन आदिवासी जमाती मध्ये वर्षानुवर्षे घुसखोरी करत आहेत त्यांचा. पोटतिडकीने आणि लोकशाही मार्गाने केला पाहिजे

मग एखादा बिगर आदिवासी माणूस जर माझ्या आदिवासी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी निस्वार्थ आपल्या जीवाचे रान करत असेल तर आपण त्यांचा विरोध न करता त्याला मदत करणे अपेक्षित आहे. परंतु आज काही नोकरदार वर्ग मात्र विरोधी भूमिका घेत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना काही गरज नाही, माझ्या आदिवासी बांधवांच्या रोजच्या जीवनातील प्रश्न सुटावे. कारण त्यांना दोन वेळचं जेवण मिळतं. परंतु असंख्य आदिवासी बांधवांना दोन वेळच्या जेवणासाठी अहोरात्र कष्ट करावे लागते आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आपले प्रश्न सोडवायला लागतात. त्यामुळे ज्यांनी आदिवासी जमातीच्या प्रमाणपत्र बळकावून घुसखोरी करून सोई सुविधा लुबाडल्या आहेत. त्या बोगस आदिवासीचांच विरोध केला पाहिजे आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी कोणाचेही अंध भक्त होण्यापेक्षा आपली खरी संस्कृती जपली पाहिजे.

✍️- संदीप मरभळ

     ९९६०९५०८२८

संबंधित लेख

लोकप्रिय