Thursday, December 12, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य, मी बारावीत नापास, बसलो तीनदा - विशाल विमल

जनभूमी साहित्य, मी बारावीत नापास, बसलो तीनदा – विशाल विमल



मी बारावीत नापास, बसलो तीनदा

      बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला. जे पास झाले त्यांचे अभिनंदन ! जे नापास झाले त्यांचा मी सख्खा मित्र आहे. त्यामुळे त्यांना शिव्या-शाप देणे, त्यांना नावे ठेवण्याचे काम मी करू शकत नाही आणि तो माझा स्वभावही नाही. मी लिहिणार आहे, त्यावर माझे परिचित कुणी फारसे विश्वास ठेवणार नाही, पण प्रामाणिकपणे सांगतो की, मी बारावीत नापास झालो होतो आणि दोनदा नव्हे तर तीनदा बारावीच्या वर्गात बसलो आहे. तेही आर्ट्स – कला शाखा. सायन्स – विज्ञान शाखेत बारावीला असतो तर आजवर तरी मी बारावीतून पुढे सरकलो नसतो, हे मी खात्रीपूर्वक सांगतो.

      मला मराठी लिहिता, वाचता येत नव्हते म्हणून मी सहावीत पहिल्यांदा नापास झालो. कुणाला वाटेल की, मी इंग्लिश मेडियमला असेल म्हणून मला मराठी वाचता, लिहिता येत नसेल, पण तसे नव्हे. मी मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलो आहे. पुढेही माझे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे. मात्र मला मराठी वाचता, लिहिता येत नसतानाही मी सहावीपर्यंत कसा आलो, हे गुरुजी आणि शिक्षकांना माहीत असेल, मला मात्र त्याबद्दल काहीच माहीत नाही. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला जेथे सहावीपर्यंत मराठी वाचायला, लिहायला येत नव्हते, तिथे इंग्लिश येत असेल असा विश्वास बाळगणेच इनव्हॅलीड आहे. मी नापास झाल्यावर पुन्हा शाळा सुरू होण्याअगोदर तोडकेमोडके मराठी लिहायला वाचायला शिकलो आणि पुन्हा सहावीच्या वर्गात जाऊन बसलो.

      शाळेत मराठी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, गणित आदी मराठी भाषेतून ४- ५ विषय असतात. मराठी भाषेला जवळचा असलेला हिंदी एक विषय आहे. आणि इंग्लिशमधुन एकच विषय असतो. त्यामुळे ४ -५ विषयांच्या दृष्टीने मला मराठी भाषा वाचायला, लिहायला आली, हे माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते. पण खरी गंमत पुढे सुरू झाली. पहिली ते पाचवीपर्यंत काय शिकविले यातले माझ्या डोक्यात काहीच गेले नसल्याने माझी पाटी कोरी होती. त्यामुळे वाचता, लिहिता येत असूनही शिक्षक शिकवत असलेला धडा-प्रकरण समजून घ्यायला मला अवघड जात होते. शिक्षक शिकवत असलेल्या भागाचा, काही भाग अगोदरच्या इयत्तेत शिकविला असल्याने आता शिक्षक काय शिकवत आहेत, ते समजून घ्यायला डोक्याला ताण द्यावा लागायचा आणि तो मी द्यायचोही. एक मात्र खरे की, मराठी भाषेशीसंबंधित ४-५  विषयांसाठी मला इतका प्रयास करावा लागत होता. त्यामुळे मला इंग्लिशकडे लक्ष देण्याची इच्छाच कशी होईल? आणि ती झालीही नाही. त्यामुळे अकरावीपर्यंत ३५, ३६ गुण मिळून मी इंग्रजीत पास होत बारावीपर्यंत आलो. अर्थात सहावीपर्यंत मला मराठी लिहिता, वाचता येत नसतानाही मी तिथवर आलो होतो, तसेच इंग्रजी लिहिता, वाचता येत नसतानाही मी बारावीपर्यंत आलो होतो. ते कसा आलो हे शिक्षकांना माहीत. मात्र बारावीपर्यंत मराठी माझे छान झाले होते. बऱ्यापैकी वैचारिक वाचन मी केले होते. भाषण स्पर्धांमध्ये मी क्रमांक मिळवत होतो, इतके मराठीतील बोलणे माझे ठीकठाक झाले होते. गावातील, तालुक्यातील काही सामाजिक उपक्रमात असायचो. नियतकालिकात मोडकेतोडके लेखन करू लागलो होतो. कॉलेजच्या सांस्कृतिक, लेखन विभागात सहभागी व्हायचो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अपत्य असलेल्या विवेक वाहिनी विभागाचा संघटक म्हणून कॉलेजात काम करायचो. मात्र इंग्रजी लिहिता, वाचता येतच नसल्याने इंग्रजीचा अभ्यास करायचा प्रश्नच नव्हता !

        बारावीचा वार्षिक परीक्षेचा फॉर्म भरला होता.  परिक्षेच्या अगोदर आठवडाभर आईला सांगितले की, ”मी गैप घेतो. परीक्षा देत नाही. मी इंग्रजीत नापास होईल आणि इतरही विषयांचा माझा अभ्यास झाला नाही. त्यामुळे पुढच्यावर्षी सर्व विषय घेऊन मी पुन्हा बारावीत बसतो.” माझे हे बोलणे ऐकून आईला काय बोलावे हेच सुचत नव्हते. आईने मग काकुळतीला येऊन मला सांगितले की, ‘परीक्षा दे. ज्या विषयात नापास होशील तेवढे विषय पुढच्या वर्षी देता येतील’. आई जरी खरे सांगत असली तरी तिचे ते बोलणे मला पटत नव्हते, पण मी आईच्या इच्छेखातर परीक्षेला जाऊन बसत होतो आणि पेपर देत होतो. इतर सर्व विषयांचे पेपर दिले. मात्र इंग्लिशचा पेपर दिला नाही. पेपरच्या दिवशी शेजारच्या गावात असलेल्या ग्रंथालयात जाऊन वाचत बसलो. त्या ग्रंथालयात जाताना माझ्या घराशेजारच्या एका व्यक्तीने मला पाहिले होते. त्याने ते घरी आईला सांगितले होते. मी सायंकाळी घरी गेल्यावर आईने माझ्यावर रागवायला सुरुवात केली. पण मी पेपरला गेलो होतो आणि पेपर दिला, यावर शेवटपर्यंत ठाम राहीलो. त्यामुळे रागारागिला पूर्णविराम मिळाला. मला वाटायचे की दिलेल्या पेपरपैकी एक-दोन विषयात मी नापास होणार आहे आणि पेपर न दिलेला इंग्रजी विषय आहेच. त्यामुळे पुढच्या वर्षी सर्व विषय घेऊन पुन्हा बारावीत बसायचे हे माझ्या डोक्यात पक्के होते. A, B, C, D पासून इंग्रजीचा अभ्यास सुरू करायचा, क्लास लावायचा आणि इतर विषयांचा छान अभ्यास करून चांगल्या गुणांनी पुढच्यावर्षी बारावी उत्तीर्ण व्हायचे, असे मी मनोमन ठरवले होते. 

     तीनचार महिन्यांनी बारावीचा निकाल लागला. इंग्रजीसोडून मी सर्व विषयात पास झालो होतो. त्यामुळे माझी उलटीच चक्र फिरू लागली. सर्व विषय घेऊन पुन्हा बारावीत बसायचे स्वप्न मी विसरून गेलो होतो. ऑक्टोंबर महिन्यात केवळ इंग्रजीचा पेपर द्यायचा असे मी ठरविले. फॉर्म भरला. मात्र दोनतीन महिने जवळ असतानाही इंग्रजी लिहायला, वाचायला शिकलो नाही. काही अभ्यास केला नाही. त्यामुळे पेपर दिला नाही. पुन्हा मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी फॉर्म भरला. क्लास लावला. वास्तव परिस्थिती सरांना मी समजून सांगितली. पण तिथेही क्लासला नियमित जाईल तो मी कसला ? पण सरांनी व्याकरणाच्या आणि उताऱ्यांवरील प्रश्न सोडविण्याबाबत काही ट्रिक सांगितल्या. मी परीक्षेला जाऊन बसलो. पण पेपर पाहून माझे डोके गरम व्हायला लागले.२०- २५ मिनिटांतच सरांना मी पेपर परत घ्यायचा आग्रह करू लागलो. पण सर म्हणाले की, अर्धापाऊण तास झाल्याशिवाय पेपर परत घेता येणार नाही. सर जवळ आले. माझा पेपर पाहिला. मागच्या पुढच्या मुलांचे पेपर पाहून मला काही रिकाम्या जागा, जोड्या लावा याची उत्तरे सांगू लागले. पण मला ते पटत नव्हते. माझ्यातील करारी कार्यकर्त्या जागा झाला. त्या वयात मी सरांना निक्षून सांगितले की, ‘सर मला अजिबात काही उत्तरे सांगू नका. मला कुणाचे पाहून पासही व्हायचे नाही. कारण आपल्याकडे यापद्धतीने बेरोजगार पदवीधर पुष्कळ झाले आहेत. मला तसे व्हायचे नाही.’  माझे हे भाषण ऐकून सर गारदच झाले. मी मात्र अर्धा तास कुठेही मान न वळवता पुढच्या विद्यार्थ्याच्या डोक्याकडे पाहत शांत बसलो. माझे इंग्रजीचे शिक्षक परीक्षागृहात फेरी मारायला आले होते. तेव्हा त्या सुपरवायझर सरांनी माझ्याशी घडलेला किस्सा माझ्या इंग्रजीच्या सरांना सांगितला. त्या दोघांमध्ये काही तरी बोलणे झाले. माझे सर बाहेर जाताना माझ्याकडे पाहून हसत गेले. पुढे बारावीचा निकाल लागला. मी इंग्रजीत नापास झालो होतो. अशा रीतीने माझी बारावीत दोन वर्षे गेली.

         जून महिन्यात कॉलेज सुरू झाले. मी रीतसर बारावीला  कॉलेजला ऍडमिशन घेतले आणि माझे बारावीचे तिसरे वर्ष सुरू झाले. बारावीच्या वर्गात पहिल्या बैंचवर जाऊन वर्षभर बसलो. पहिल्या वर्षी माझे बारावीला काय झाले, दुसऱ्या वर्षी काय झाले आणि मी आता बारावीत पुन्हा कसा ? याची कुणाला काही उकल होत नव्हती. मी माझ्या इतर कलागुणांमुळे कॉलेजात प्रसिद्ध होतो, त्यामुळे इंगजीच्या प्रकारामुळे मी पुन्हा बारावीत आहे, अशी कुणाला शँका येण्याचीही शक्यता नव्हती. माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील माझा हा प्रवास माहीत असण्याची शक्यता नाही. कारण मी तितकी गुप्तताच पाळली होती. कुणी काही विचारले तर बारावीला गैप घेतला होता, इतकेच उत्तर मी द्यायचो आणि अन्य विषय बोलायला सुरुवात करायचो. बारावीचे वर्ष छान गेले. इंग्रजीत ३५ गुण मिळून मी बारावीला ७० टक्के गुण घेऊन पास झालो. अशी ही बारावीची गंमत आहे.

     पुढे मी बीए केले. जर्नालिझम केले. पुण्यात पत्रकारिता करतो आहे.  तेव्हा आणि आता इंग्लिश कसे आहे आणि इतर किस्से मी पुढे सविस्तर लिहिणार आहेच. पण एक सांगतो की, माझे आजपर्यंतचे कोणतेही लेखन जर पाहिले तर त्यात अद्यापही स्पेलिंगसह इंग्लिशमध्ये लिहिलेला एकही शब्द सापडणार नाही. यावरून माझे आजही इंग्लिश कसे असावे, हे ठरविणे कुणालाही सोपे जाईल.

विशाल विमल

पिंपळगाव- मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.

संबंधित लेख

लोकप्रिय