पुणे:- राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं मध्यरात्री पुण्यात निधन झाल्याचं त्यांचे नातू आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. ते ९१ वर्षांचे होते. निलंगेकर यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे इथं उपचार सुरु होते. त्यातून दोनच दिवसांपूर्वी ते विषाणूमुक्त होऊन घरी परतले होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलंगेकर प्रदीर्घ काळ राजकारणात होते. १९६२च्या विधानसभा निवडणुकीत ते निलंगा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसंच राज्य मंत्रिमंडळात विविध मंत्रीपद त्यांनी भूषविली. त्यानंतर तीन जून १९८५ ते सहा मार्च १९८६ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
निलंगा इथं आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.