मुंबई:- राज्यात काल मुंबई, ठाणे, रायगड, कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काल पाऊस झाला. मुंबईत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली असून हिंदमाता, दादर, कुर्ला, माटुंगा, गव्हाणपाडा, चेंबूर, अंधेरी अग्निशमन केंद्र, वर्सोवा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, धारावी, वरळी, या ठिकाणी पाणी भरलं आहे.
पुराच्या पाण्यात अनेक गाड्या बंद पडल्या असून मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना काल सुट्टी देण्यात आली होती. मिठी आणि पोयसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदी लगतच्या वस्त्यातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. सध्या पाऊस थांबला असला तरीही ढगाळ वातावरण आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
मुंबई व्यतिरिक्त कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईतसह उपनगरात आज पुन्हा सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे.