बीड : पंकजा मुंडेंची ही भूमिका म्हणजे ऊसतोड कामगारांची घोर फसवणूक आहे, अशी टिका महाराष्ट्र उसतोडणी व वाहतूक कामगार संघटना (सिटू) चे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
२७ तारखेच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांनी आंबेजोगाईच्या मेळाव्यात २१ रुपये प्रति टन वाढ द्या, अशी भूमिका घेऊन ऊसतोडणी कामगार, मुकादम यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पंकजा मुंडेंची ही भूमिका म्हणजे ऊसतोड कामगारांची घोर फसवणूक आहे अशी टिका सिटू प्रणित महाराष्ट्र उसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल कराड यांनी केली आहे.
पंकजा मुंडे या ऊसतोड कामगारांच्या नेत्या नाहीत तर त्या स्वतः साखर कारखानदार आहेत. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा वारसा त्यांनी सोडून दिलेला आहे. आज गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनी पंकजा मुंडे यांचा समाचार घेतला असता. मागच्या कराराच्या वेळीही त्यांनी ऊसतोड कामगार, मुकादमाची फसवणूक केली व आताही ऊसतोड कामगारांच्या मुळावर त्या उठल्या असल्याचे सिटू ने म्हटले आहे.
सात पैकी पाच ऊसतोडणी कामगार संघटनांनी लवादाला विरोध केला आहे. तशा आशयाचे लेखी पत्र राज्य सहकारी साखर संघाला पाठवले आहे. याउपरही लवादा मार्फत निर्णय लादल्यास त्याचे तीव्र परिणाम होतील, असा इशारा देण्यात आला आहे.
पंकजा मुंडे यांनी घेतलेली भूमिका कुठल्याही ऊसतोडणी कामगार संघटनेला मान्य नाही. त्यांनी कुठल्याही संघटनेशी चर्चा केलेली नाही व त्यांना असा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. पंकजा मुंडे ह्या साखर कारखानदारांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत, हेच यावरून सिद्ध होत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
सीटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना व अन्य पाच संघटना संप सुरूच ठेवतील. २७ तारखेच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, प्रा. डॉ. सुभाष जाधव, दत्ता डाके, सय्यद रज्जाक, बळीराम भुबे, मोहन जाधव, अशोक राठोड, सुदाम शिंदे, बाळासाहेब चोले यांनी दिला आहे.