पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आकुर्डी चिखली रोडवर सम-विषम अशी पार्किंगची सोय असूनही, अनेक बेशिस्त वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी बिनदिक्क्त उभ्या करतात. काही वाहनचालक पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे कठीण होते. आकुर्डी चिखली रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने येथे पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. त्यातच बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडीदेखील पहावयास मिळते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू केल्यामुळे दुचाकीचालकांना थोडीफार का होईना शिस्त लागू शकेल.
पदपथावरून चालणेही अवघड
आकुर्डी-थरमॅक्स चौक-साने चौक-चिखलीकडे जाणारा रस्ता हा वर्दळीचा आहे. शाळा, कॉलेज, कामावर जाणाऱ्या नागरिकांची या ठिकाणी गर्दी असते. त्यांची वाहने रस्त्यावरच उभी केलेली दिसून येते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा या मार्गावर वाहतूककोंडी होते.महापालिकेने अनेक ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. तरीदेखील काही वाहनचालक बेशिस्तपणे आपली वाहने या ठिकाणी उभी करतात. वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावर सध्या कारवाई सुरू आहे. सम-विषम पार्किंगचे नियोजन असूनसुद्धा दुतर्फा पार्किंग केले जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे. येथे ठोस उपाययोजना करावयास हवी, असा सूर आता नागरिकांमधून उमटत आहे.
सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
परिसरात व्यावसायिक दुकाने, शाळा, भाजी मंडई, बसस्थानक तसेच खाऊ गल्ली असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगसंबंधी फलक लावण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी, वाहनधारकांना शिस्त लागावी, हा त्यामागील हेतू आहे. परंतु, परिसरातील दुचाकीचालक बेशिस्तपणे वाहने रस्त्याचाकडेला उभी करीत असून, येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. सदर परिसरात मुख्य रस्त्याला दोन्ही बाजूला व्यापारी गाळे तसेच निवासी गाळ्यानासुद्धा व्यावसायिक गाळ्याचा स्वरूप देण्यात आले आहे. परंतु बहुसंख्य इमारतींना ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधा नाही, पार्किंग मध्येच बहुतेकाने व्यवसायात थाटल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता पार्किंग शिवाय इमारत बांधता येत नाही. असा नियम असताना सुद्धा या इमारती मालकावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, किंवा महानगरपालिका तसे करण्याच्या मनस्थितीत नाही त्याचं कारण गुलदस्त्यात आहे. नागरिकांनी आपली वाहने पार्किंग करताना कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने लावायला हवी. मात्र, अधिकृत पार्किंगची सुविधा नसल्याने नाईलाजास्ताव वाहन चालकांना रस्त्यावरच गाड्या पार करावे लागतात. त्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. महानगरपालिकेने सदर परिसरात पार्किंगसाठी जागा निश्चित करावे व पार्किंग मध्ये व्यवसाय थाटणाऱ्या व रस्त्यावर हातगाड्या लावून अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.