पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:आदर्श व्यावसायिक होण्यासाठी संयम,
ध्येय-धोरणाबरोबरच बोलण्याचे अर्थात संभाषण कौशल्य महत्वाचे आहे असे मत प्रसिद्ध व्यवसायिक मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत यांनी व्यक्त केले महात्मा गांधी सेवा संघ संचलित पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व श्रीयश एज्युकेशन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग महिलांच्या मोफत व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात श्रीकृष्ण सावंत बोलत होते.
औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले,सामाजिक कार्यकर्त्यां भाग्यश्री मोरे,पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके, रमेश मुसुडगे, समृद्धी कुलकर्णी,समुपदेशक हरिदास शिंदे,सहाय्यक ईश्वर चाळक,प्रहार संघटनेचे दत्ता भोसले,अभय पवार,सुनंदा बामणे यांचेसह दिव्यांग महिला तसेच दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
मेळाव्यादरम्यान ३० ते ४० व्यवसायाची सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर प्रश्नोत्तरे व खुली चर्चा झाली.आगामी काळात यामधील इच्छुक व्यवसायचे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सत्रसंचालन रमेश मुसुडगे यांनी केले. हरिदास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.