Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMahaparinirvan Din 2024 : शिकाल तर टिकाल! शिका, संघटित व्हा,...

Mahaparinirvan Din 2024 : शिकाल तर टिकाल! शिका, संघटित व्हा, संघर्ष करा- जय भीम कॉम्रेड लाल सलाम!

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली (Mahaparinirvan Din 2024)

तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.

केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.

भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.

महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले.

भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले. यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले. ५ जुलै १९२० रोजी ‘सिटी ऑफ एक्टिटर’ या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले. (Mahaparinirvan Din 2024)

आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर “देशाचे दुश्मन” हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.

भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.

सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी समतावादी चळवळी सुरू केल्या. बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला. इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत. (Mahaparinirvan Din 2024)

हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.

आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.

महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी ६ डिसेंबरला जगातून, तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात.

भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.

भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.

आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले.

आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.

आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.
त्यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, हा संदेश दिला आहे. या अत्याधुनिक जगात मल्टी स्किल शिक्षण खूप महत्वाचे आहे, बाबासाहेबांची पुस्तके वाचून आपण आपला उत्कर्ष करू शकतो.


संकलन – क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय