Monday, December 23, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : काश्मिर फाईल्स; हिंदुत्त्ववाद्यांकडून हिंदूंची दिशाभूल...

विशेष लेख : काश्मिर फाईल्स; हिंदुत्त्ववाद्यांकडून हिंदूंची दिशाभूल…

काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट आला. देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा जणूकाही ह्या चित्रपटातूनच काश्मीर च वास्तव कळलं अशा पद्धतीने खुद्द पंतप्रधानांनी त्याचं प्रमोशन केलं. समर्थक म्हणतात हेच वास्तव आहे, विरोधक म्हणतात हे अर्धवट सत्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून जो काश्मीर प्रश्न या देशाला छळतोय त्या काश्मीर प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा आज प्रयत्न करूयात.

या देशात कुण्याही समुदायावर असे हल्ले होणे हे सर्वार्थाने निषेधार्हच आहे. जे त्यावेळी झाले ते वाईटच झाले यात कुणालाच काही शंका नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे जो हल्ला काश्मिरी पंडितांवर चित्रपटात दाखविण्यात आला तो जणूकाही काश्मीर मधील सामान्य मुस्लिमांनीच केला आणि त्यात फक्त काश्मिरी पंडितांवरच हल्ले झालेत असे दाखविण्यात आले जे की सत्य नाही. हल्ले पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केले होते आणि त्यात पंडितांसह स्थानिक मुस्लिम आणि शीख बांधवांवर सुद्धा हल्ले झाले होते. या घटनेत कोणत्या समुदायाचे किती लोक मरण पावले अशी माहिती पानिपत चे पी.पी.कपूर यांनी माहितीच्या अधिकारात मागितली असता त्यांना श्रीनगर पोलीस मुख्यालयातून लिखित स्वरूपात माहिती देण्यात आली की, या १९९० च्या घटनेत ८९ काश्मिरी पंडित मारल्या गेले तर १६३५ मुस्लिम आणि शीख समुदायातील लोक मारले गेले होते. म्हणजेच पाकिस्तानी आतंकवाद्यांनी स्थानिक मुस्लिमांना सुद्धा मारलं होतं. हे सत्य दाखविण्यात आले नाही. 

हा चित्रपट दाखवून हिंदू-मुस्लिमांमधील द्वेष वाढविण्याचा प्रयत्न होतोय असे विरोधक म्हणत आहेत. हा चित्रपट दाखवून काही कट्टरवादी संघटना जणू ह्या सर्व प्रकाराला काँग्रेस पक्ष जबाबदार असाच प्रचार करत आहेत. आपणसुद्धा फक्त चित्रपट पाहतो परंतु त्यात दाखविलेल्या गोष्टी खऱ्या-की खोट्या हे तपासून पाहत नाही. त्या तपासून पाहण्याकरिता मुख्य अडचण म्हणजे त्यासंबंधीचे पुस्तके, संदर्भ, पुरावे सुद्धा उपलब्ध नसतात. 

हा काश्मीर प्रश्न मुळात निर्माण कसा झाला तर जम्मू काश्मीर चे तत्कालीन महाराजा रणबीरसिंग (1857-1885) यांच्याकडे मुघलांच्या काळांत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलेले राजौरी, पुंछ आणि श्रीनगर भागातील मुस्लिम आले जे की पूर्वीचे काश्मिरी पंडित होते. त्यांनी याचना केली की आमच्या पूर्वजास व आम्हास जबरीने धरून पकडून मुस्लिम करण्यात आले आहे, आम्हास आमच्या मूळ हिन्दु धर्मात परत घ्या. रणबिरसिहांनी तत्कालीन प्रमुख काश्मिरी पंडितांना बोलावून त्यांना विचारले की, जबरीने मुस्लिम झालेल्या तुमच्याच नातलगांचे आपल्या मूळ धर्मात पुनरागमन तुम्हाला मंजूर आहे काय? त्यांना परत घेण्यासाठी धर्मात काही तरतूद आहे का ? विचारले असता, सर्व काश्मिरी पंडितांनी त्याला एकमुखाने नकार दिला. अशी कुठलीही तरतूद अथवा विधी आपल्या धर्मात नसल्याचे त्यांनी सांगितले. राजा रणबीरसिंहसुद्धा धर्मगुरूंच्या निर्णयाविरुद्ध गेले नाहीत . त्या जबरीने धर्मांतरण करण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांच्याच बंधूंच्या सल्ल्याने परत हिंदू करून घेतलं नाही त्याचंच फळ भारत देश आज गेली अनेक वर्षांपासून काश्मीर मुद्द्याच्या रूपाने भोगतो आहे . ज्यांनी त्या काश्मिरी पंडितांच धर्मांतरं होऊ शकत नाही असा निर्णय रणबिरसिहांना दिला होता त्यांचेच हजारो वंशज आज दिल्ली आणि परिसरात निर्वासितांच जगणं जगत आहेत. आज काश्मिरात मुस्लिमांची संख्या किती आहे? तेव्हढं हिंदू धर्माचं नुकसान झालंय. कुणामुळे?  त्याचवेळी जर त्या जबरदस्तीने धरून-बांधून मुस्लिम केल्या गेलेल्या पंडितांना त्यांच्याच नातेवाईकांनी हिंदू धर्मात परत घेतलं असत तर आज हा काश्मीर चा प्रश्नच राहिला नसता.

हा वरील प्रसंग बघितला की ह्या प्रसंगाच्या २०० वर्ष आधीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आठवल्या शिवाय राहत नाही. शिवरायांच्या काळातसुद्धा नेताजी पालकरांच 17 मार्च 1667 रोजी मुस्लीम धर्मात जबरदस्ती धर्मांतर करण्यात आलं होतं. 1676 मध्ये जेव्हा नेताजी पालकर पुन्हा स्वराज्यात परत आले तेव्हा महाराजांनी धर्ममार्तंडांच्या, धर्मपंडितांच्या विरोधाला अज्जीबात न जुमानता नेताजींना पुन्हा हिंदुधर्मात सामावून घेतले. मोहम्मद कुलीखान पुन्हा नेताजी पालकर झाले. याचप्रमाणे बजाजी नाईक निंबाळकर यांनासुुध्दा हिंदू धर्मात नुसतं परतच घेतलं नाही तर त्यांचा मुलगा महादेव याला स्वतःची मुलगी सुद्धा दिली. या दोन्ही घटनांच्या वेळी महाराजांनी “जर आपल्या धर्मात अशी तरतूद नसेल, असे प्रयोजन नसेल तर ते तयार करा, नवीन नियम तयार करा पण आपलीच माणसे परत आपल्या धर्मात घ्या.” असे ठणकावले आणि त्या धर्मगुरूंना पालकर व निंबाळकरांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावं लागलं. हीच उदारता आणि दूरदृष्टी जर राजा रणबीरसिंहांनी दाखविली असती तर? काश्मिरी पंडितांनी दाखविली असती तर? 

ज्या काश्मिरी पंडितांनी आपल्याच भावांना परत स्वधर्मात येऊ दिले नाही, स्पष्ट नकार दिला त्यांच्याच तेव्हाच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम त्यांना आणि देशाला आज भोगावे लागत आहेत.

भाजप सरकारने वाजपेयींच्या काळातील काही वर्ष आणि आता २०१४ पासून तर २०२२ पर्यंतची ८ वर्ष या मोठ्या कालावधीत त्या काश्मिरी पंडितांसाठी काय सुख-सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यात? किती काश्मिरी पंडितांना त्यांनी पुन्हा काश्मीर खोऱ्यात नेऊन वसवलं आहे?  बर मग चित्रपट दाखवून काय होणार?  दिग्दर्शक-निर्माते बक्कळ पैसा कमावणार, देशात दोन धर्मात द्वेष वाढल्याने तुमचे मताचे राजकारण होणार पण शेवटी काश्मिरी पंडितांचे काय?  त्यांना काय मिळणार? चित्रपट टॅक्स फ्री केला, फुकट दाखवला, तो देशातल्या १३८ कोटी जनतेने बघितला तरी काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीत काय सुधारणा होणार? त्यांना कोणते पॅकेज मिळणार आहे? ते प्रस्तापित होतील? त्यांच्या मालमत्ता त्यांना परत मिळतील? 

हा चित्रपट आल्यानंतर जे काश्मिरी पंडित अजूनही काश्मीर मध्ये राहतात त्यांच्यातून या चित्रपटाविषयी तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ह्या चित्रपटात एकतर्फी असून यात अनेक बाजू दडवल्याचे ते काश्मिरी पंडित सांगत आहेत. हे अत्याचार जणू तेथील स्थानिक नागरिकांनीच केले असा खोटा प्रचार केला जातोय आणि आमच्या जीवनावर अशा गोष्टींचा विपरीत परिणाम होईल असेही ते म्हणत आहेत. आपली मानसिकता अशी झाली आहे की चित्रपटावर विश्वास आहे पण ज्यांनी तो प्रसंग प्रत्यक्षात अनुभवला त्यांच्यावर विश्वास नाही. आजही ते काश्मिरी पंडित ओरडून ओरडून सांगत आहेत की, १९९० मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी काश्मिरातील स्थानिक मुस्लिमांना सुद्धा धमक्या दिल्या की, जो काश्मिरी पंडितांना आश्रय देईल त्याला ठार करू, तरीसुद्धा स्थानिक मुस्लिमांनी पंडितांना आश्रय दिला आणि ते शेकडो स्थानिक मुस्लिम सुद्धा मारले गेले. या चित्रपटातून दोन धर्मात फक्त द्वेष फैलावला जातोय, देश अराजकतेकडे जातोय. परंतु आपल्याला चित्रपटावर विश्वास आहे, घटना भोगलेल्या जिवंत माणसांवर नाही. ज्यांनी तो अन्याय अनुभवला ते सांगत आहेत की चित्रपटात अर्धसत्य दाखवून द्वेष वाढवला जातोय म्हणजेच जे लोक ह्या चित्रपटाचा प्रचार -प्रसार करत आहेत ते लोक हिंदूंची दिशाभूल करत आहेत.

या घटनेकडे पाहतांना तत्कालीन राजकीय स्थितीकडे सुद्धा बघावे लागेल. ही घटना जेव्हा घडली त्यावेळी केंद्रात भाजपा समर्थित व्ही.पी. सिंग यांचे सरकार होते. यावेळी काश्मीरचे राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नेते जगमोहन मल्होत्रा हे राज्यकारभार पाहात होते. सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी या भाजपा समर्थित व्ही.पी.सिंग सरकारमध्ये देशाचे गृहमंत्री काश्मीरचेच मुस्लिम नेते मुफ़्ती मोहम्मद सईद होते. म्हणजे देशाच्या इतिहासात एकदाच देशाचे गृहमंत्री मुस्लिम होते आणि तेसुद्धा भाजप समर्थित व्ही.पी.सिंग सरकारमध्ये. मग १९९० मध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळी व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा भाजप ने का काढला नाही? त्याचवेळी काश्मिरी पंडितांसाठी का धावून गेले नाहीत? याच मुफ़्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रूबैय्या सईद चे आतंकवाद्यांनी अपहरण केले. आणि तिला सोडण्याच्या मोबदल्यात व्ही.पी.सिंग सरकारने पाच आतंकवादी हमीद शेख़, शेर ख़ाँ, जावेद अहमद ज़रगर, मोहम्मद कलवल आणि मोहम्मद अल्ताफ़ बट्ट यांना सोडून दिले ह्यावेळी भाजपने ह्या सरकारचा पाठिंबा का काढला नाही? कारण त्यांना देशहित आणि काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडापेक्षा सत्ता महत्वाची होती.

मग भाजप ने पाठिंबा केव्हा काढला? जेव्हा व्ही.पी.सिंग सरकारने मंडल आयोगाच्या हिंदू ओबीसींना २७% आरक्षण देण्याच्या शिफारशींना मान्यता दिली आणि लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा अडविल्या गेली त्यावेळी भाजप ने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. म्हणजे काश्मिरात हिंदूंवर अत्याचार होत असतांना पाठिंबा काढला नाही तर हिंदूंना २७% आरक्षणाचा अधिकार मिळाला म्हणून भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडलं. स्वतः व्ही.पी. सिंग यांनी म्हंटल आहे की, “मला वाटत होत की, भाजप आमच्या सरकारला किमान २ वर्ष पाठिंबा देईल परंतु मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू केल्याने भाजपने एकाच वर्षात पाठिंबा काढून घेतला. जर आम्ही मंडल आयोग लागू केला नसता तर भाजप पाठिंबा देत राहिली असती. इंदिरा गांधी सेंटर ऑफ़ आर्ट्सचे प्रमुख राम बहादुर राय यांनी आपले पुस्तक ‘मंजिल से ज्यादा सफर’ मध्ये ही नोंद करून ठेवली आहे. आता हिंदूंनी लक्षात ठेवायला हवे की हिंदू काश्मिरी पंडित असो की ओबीसी हिंदू असो, ह्यांना सत्तेशिवाय कुणाचेच काही घेणे देणे नाही.

काँग्रेस सरकारवर ह्या काश्मीरच्या घटनेचे खापर फोडण्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचं लपून राहिलेलं नाही. पण आपण हीसुद्धा माहिती घेतली पाहिजे की,  मनमोहन सिंग सरकार च्या काळात ह्या काश्मिरी पंडितांना 10 वर्षात पंतप्रधान पॅकेजमधून 3000 नोकऱ्या दिल्या गेल्यात,  ह्या काश्मिरी विस्थापितांसाठी ५९११ घरे बांधली गेलीत. भाजपने काय केले?  आज इतकी आगपाखड करण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्यांनी त्या काश्मिरी पंडितांसाठी काही केले आहे त्यांनाच कि ज्यांनी काहीच केले नाही त्यांना? आता सरकारने पंतप्रधानांसाठी घेण्यात आलेले एखाद विमान कमी घ्यावं, गरज नसलेल्या नवीन संसद भवनानावर निरर्थक होणारा २० हजार कोटींचा खर्च थांबवावा व ह्या काश्मिरी पंडितांसाठी पॅकेज जाहीर करून त्या सर्वांना पुन्हा काश्मीर खोऱ्यात प्रस्तापित करावं. पॅकेज कोरोनाकाळातील २० लाख कोटींच्या पॅकेज सारखा जुमला नसावा. खरोखर पॅकेज जाहीर करून त्याची कडेकोट अंमलबजावणी करावी. 

देशात पुलवामा हल्ला झाला त्यात ४० जवान मारले गेले त्यांच्या नावावर मते मागितली गेली अजूनपर्यंत त्या हल्ल्याचा शोध लागला नाही. मग सुशांतसिंग राजपूतचा कळवळा आला त्याला न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी करून मते मागितली गेली, ते प्रकरण दबून गेलं. मग दिशा सालियन ला न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी झाल्या ते प्रकरण थंड पडलं. आता देशातली महागाई, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, राफेल आणि बँक घोटाळे ह्या सर्व ठिकाणी अपयशी ठरलेलं हे सरकार मतांसाठी काश्मिरी पंडितांचा वापर करत आहे. आगामी २०२४ ची निवडणूक झाली की ह्याच केंद्र सरकारकडून  नवीन एखाद प्रकरण काढून हिंदूंना पुन्हा मूर्ख बनविल्या जाईल तोपर्यंत वाट बघुयात…

– चंद्रकांत झटाले, अकोला

  9822992666

(टीप : लेखात व्यक्त झालेल्या मतांशी महाराष्ट्र जनभूमी सहमत असेलच असे नाही.)


संबंधित लेख

लोकप्रिय