बेरोजगारी ही जटील राष्ट्रीय समस्या – प्रीती शेखर
सोलापूर : केंद्र सरकार सार्वजनिक उद्योगधंद्याचे खाजगीकरण करत असल्याने कित्येक सुशिक्षित तरूणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे, तरुणांना नोकरीची खोटी स्वप्ने दाखवून दिशाभूल करणारे मोदी सरकारमुळे तरुणाईत उदासीनता व वैफल्यग्रस्तता वाढत असून बेरोजगारीची समस्या ही आता राष्ट्रीय जटील समस्या बनल्याचे टीका डीवायएफआयचे राज्य सचिव प्रीती शेखर यांनी केली.
त्या बोलताना पुढे म्हणाल्या की, बेरोजगारी विरुद्ध तरूणांनी वज्रमुठ आवळली पाहिजे. तरूणांना आपल्या शिक्षण आणि रोजगार या अधिकारा पासून परावृत्त करण्यासाठी धर्मांधता, जातीयता, भावनिक मुद्द्यांच्या आधारे त्यांना लक्ष्य करत आहेत. हा धोका सहज ना घेता यावर गांभीर्याने उत्तर देणे आवश्यक आहे. यासाठी अल्पावधीतच शिक्षणाचे बाजारीकरण आणि रोजगार, तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापक, कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे प्राध्यापक यांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी युवा बेरोजगार आंदोलन छेडणार असून सोलापूरातील सर्व लढावू तरुणाईने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले.
रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी डीवायएफआय सोलापूर जिल्हा समितीचे 10 वे जिल्हाधिवेशन राज्य सचिव प्रीती शेखर, सहसचिव महिंद्र उघडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त नगर येथे पार पडले. या अधिवेशनाची सुरूवात संघटनेचा तारांकित शुभ्रध्वज जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या हस्ते फडकवून शहिदांना क्रांतिकारी अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आले.
या अधिवेशनाचे उद्घाटक सिटू राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख उद्घाटनप्रसंगी म्हणाले की, उद्याचे भविष्य आजची युवा पिढी होत. उच्चशिक्षित, सुशिक्षित असूनही ते बेरोजगार आहे ही या देशासाठी फार मोठी शोकांतिका आहे. वर्ग चार च्या नोकर भरतीसाठी पदव्युत्तर, पी.एच.डी. धारक उमेदवार सरकारी दरबारी येरझारा करत आहेत. पण त्या तरुणांच्या योग्यतेची नोकरी मिळणे कठीण आहे. ही समस्या दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत आहे सरकार मात्र ठोस उपाययोजना किंवा युवकांना सक्षम बनवण्यासाठी धोरणे राबवताना दिसत नाही हे सरकारचे उघड उघड अपयश असल्याची टीका शेख यांनी केली. सरकारचे हे अपयश तरुणांनी का पचवावे? याविरुद्ध एल्गार करा अशा शब्दांत तरुणांमध्ये स्फुल्लिंग चेतावले.
अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सिध्दप्पा कलशेट्टी, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेवंता देशमुख, सिटू राज्य सचिव युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी आदींनी अधिवेशनात येऊन भ्रातृभाव शुभेच्छा संदेश व्यक्त केले.
यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर मार्गदर्शन करताना म्हणाले की, संघटनात्मक बांधणी करताना तरुणांशी जिवंत संबंध प्रस्थापित करा. तरुणांना आकर्षित करण्यासाठी मैदानी, मर्दानी क्रीडा स्पर्धा, युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुलेखन व हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले पाहिजे. तरच चळवळ बळकट होऊ शकते. सत्ताधारी असो वा प्रस्थापित समाज व्यवस्था याला आव्हान द्यायचे असेल तर चळवळ आणि रस्त्यावरची लढाई करावी लागते. लाथ मारीन तिथं पाणी काढील ही धमक युवकांत आहे ही ओळखा असे ते म्हणाले.
यानंतर अधिवेशनाचे खुले सत्र संपवून प्रतिनिधी सत्राची सुरुवात करण्यात आली.
या सत्रात अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, विजय हरसुरे, कादर शेख आदींनी अध्यक्षीय मंडळाचे कामकाज पाहिले. प्रतिनिधी सत्रात जिल्हा सचिव अनिल वासम यांनी त्रैवार्षिक कामकाजाचा आढावा घेणारे अहवाल मांडले तर जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्ल्याळ यांनी आर्थिक अहवाल मांडले. यावर साधक बाधक चर्चा करून एकमताने मंजुरी देण्यात आली. यानंतर बेरोजगारी, धर्मांधता, स्मार्ट सिटीच्या ढिसाळ कारभार बाबत तीन महत्वाचे ठराव या अधिवेशनात मांडण्यात आले. याला एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य सहसचिव महेंद्र उघडे यांनी आवेशपूर्ण भाषणाने प्रतिनिधींना संबोधित केले.
यानंतर पुढील तीन वर्षासाठी 25 सदस्यांची जिल्हा समिती गठीत करून पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.
यामध्ये विक्रम कलबुर्गी यांची अध्यक्षपदी, अनिल वासम यांची जिल्हा सचिवपदी तर बाळकृष्ण मल्ल्याळ यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. अशोक बल्ला, विजय हरसुरे यांची उपाध्यक्ष, दत्ता चव्हाण, सनी कोंडा यांची सहसचिव, मधुकर चिल्लाळ, अकील शेख, बालाजी गुंडे यांची सचिव मंडळ पदी निवड करण्यात आली. नरेश गुल्लापल्ली, दिनेश बडगू, प्रभाकर गेंट्याल, आप्पशा चांगले, किशोर झेंडेकर, बजरंग गायकवाड, योगेश आकिम, भानुचंद्र म्याकल, श्रीकांत पेंटीं, आकांक्षा जाधव, पुष्पा गुरुपनवरू, सुनील आमाटी, राहुल बुगले, आदींची जिल्हा समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.