मुंबई : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (communist party of India – Marxist) ने रशिया आणि युक्रेन यांच्यातील सशस्त्र संघर्षावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई केली हे दुर्दैवी असून सशस्त्र हल्ले तात्काळ थांबवून शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, असेही माकप ( CPIM ) ने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर, रशियाला दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोचा पूर्वेकडे सातत्याने विस्तार होत आहे. युक्रेनला नाटोमध्ये सामील करून घेण्याच्या प्रयत्नांमुळे रशियाच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण होईल. पूर्व युरोपमधील आपल्या सीमेवर नाटो सैन्य आणि क्षेपणास्त्रांच्या उपस्थितीमुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे रशियालाही आपल्या सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे युक्रेन नाटोमध्ये सामील न होण्यासह सुरक्षेची हमी देण्याची रशियन मागणी वैध असल्याचे माकपने म्हटलं आहे.
पत्रात पुढे म्हटले, अमेरिका आणि नाटोने रशियाच्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्यास नकार दिल्याने आणि या प्रदेशात सैन्य पाठवण्याच्या अमेरिकेच्या युद्धखोर वृत्तीमुळे तणाव आणखी वाढला आहे. शांतता प्रस्थापित होण्यासाठी, पूर्व युक्रेनमधील डॉनबास प्रदेशासह सर्व लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. वाटाघाटीची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी आणि दोन्ही पक्षांनी यापूर्वी केलेल्या करारांचे पालन करावे.
माकपने भारत सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी घेऊन तातडीने पावले उचलावीत आणि सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील केली आहे.