नवी दिल्ली : झी न्यूज, विऑन, झी बिझनेस आणि झी 24 तासचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. चॅनलच्या लोकप्रिय प्राइम टाइम शो ‘डीएनए’मध्ये मोठा बदल झाल्याने सुधीर चौधरी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
झी न्यूजच्या एचआर हेड रुचिरा श्रीवास्तव यांनी पाठवलेल्या मेलमध्ये असे सांगण्यात आले आहे की, झी न्यूजसोबत 10 वर्षांच्या प्रवासानंतर सुधीर चौधरी हे स्वतःचा उपक्रम सुरू करणार आहेत. त्यांच्या इच्छेला मान देत कंपनीने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सुधीर यांच्या राजीनाम्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. सुधीरने तीन दिवसांपूर्वी डीएनए शोमधून माघार घेतली होती. त्यानंतर सुधीर यांचा शो झी हिंदुस्थानचा अँकर रोहित रंजन होस्ट करत होते.
सुधीर यांच्या राजीनाम्यानंतर झी मीडिया समूहाचे मालक सुभाष चंद्रा यांचे एक पत्रही समोर आले आहे. त्यामध्ये म्हणाला, “मी दोन दिवसांपासून सुधीरला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला स्वतःचा वेंचर (उपक्रम) सुरू करायचा आहे, त्याला त्याच्या फॅन फॉलोइंगचा वापर करून स्वतःचा एक वेंचर सुरू करायचा आहे. मला त्याच्या आड यायचे नव्हते, म्हणून मी त्यांनी राजीनामा स्वीकारला आहे आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, असे म्हटले आहे. सुधीर चौधरी यांनी 1 जुलै रोजी आपला राजीनामा सुभाष चंद्र यांना पाठवला आहे.