घोडेगाव : एकात्मिक बालविकास प्रकल्प, घोडेगाव, मुकूल माधव फाऊंडेशन व साथी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम लोकसहभागातून बाल पोषण अभियान’ आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सुरू असून या प्रक्रियेतील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन १३ सप्टेबर २०२३ रोजी जिल्हा आरोग्य सोसायटी सदस्य श्रीपाद कोंडे यांनी घोडेगाव येथे आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा व राघोजी भांगरे याच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून केले. Workshop for Malnutrition of Tribal Children in Ambegaon Taluka
यावेळी त्यांनी पोषक भाज्या आणि कंद वर्ग, वेल वर्ग युक्त परसबाग कशी विकसित करावी या बाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच घरोघरी बालकांच्या प्रथिनयुक्त खाऊचा बाळकोपरा करण्याचे महत्व सांगितले. बाल कुपोषणा संदर्भात सर्वांनीच एकत्रितपणे काम करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबेगावच्या गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रीतम बारभुवन यांनी प्रक्रियेस शुभेच्छा दिल्या. ग्रामिण रूग्णालय घोडेगावचे डॉ.राहूल जोशी यांनी गुळ- शेंगदाण्याचे पोषणातील महत्व अधोरेखीत करणारा संदेश यावेळी दिला. डॉ.अमोल वाघमारे यांनी आदिवासी बालके व मातांच्या पोषणाची गरज त्यांच्या विवेचनातून व्यक्त केली. साथी संस्थेचे शैलेश डिखळे व स्वप्निल व्यवहारे यांनी पोषण संदर्भात विविध सत्र घेऊन प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. लोक सहभागाने गाव कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार या कार्यशाळेत सर्वांनी व्यक्त केला.
या मोहिमेत आरोग्य व महिला बाल कल्याण विभागाने सक्रीय सहभाग घेतला असून तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील सोळा गावातील पोषण सहेलींना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये कुपोषणाशी जोडलेल्या आहार व आरोग्य विषयक समस्या, कुपोषणाची सामाजिक, आर्थिक कारणे,त्यावरील उपाय यावर कार्यशाळेत चर्चा घडवली. कार्यशाळेचे सूत्र संचालन राजू घोडे यांनी केले, रुपाली डामसे यांनी आभार मानले.