हरियाणा : हरियाणामध्ये दोन समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होऊन मोठा हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात २ ठार तर २० पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हरियाणा सरकारने नूह आणि गुढगाव मध्ये CrpC च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेच्या युवा शक्ती बजरंग दलाच्या वतीने नलहद महादेव मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर ब्रजमंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या एका मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर भडकलेल्या दंगलीत अनेक जण जखमी झाले. तर कित्येक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. गावात तणाव असून, पोलिसांनी ध्वजसंचलन करून शांततेचे आवाहन केले आहे.
दरम्यान, नूहमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. तसेच सोमवारी रात्री उशिरा गुढगाव, फरीदाबाद आणि पलवलमधील सर्व शाळा मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मृतांमध्ये दोन होमगार्डचा समावेश आहे. हिंसाचारत झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या वतीने आयोजित धार्मिक मिरवणूक – ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा आणि भाजप जिल्हाध्यक्षा गार्गी कक्कर यांनी गुरगावच्या सिव्हिल लाईन्स येथून झेंडा दाखविल्यानंतर नुह चौकात जातीय तणाव निर्माण झाला. हिंसाचार उफाळल्यानंतर हरियाणाच्या गुरुग्रामजवळील एका मंदिरात सुमारे २५०० पुरुष, महिला आणि मुलांनी आश्रय घेतला आहे.
हिंसाचारानंतर इतरत्र तणाव पसरू नये, यासाठी पोलिसांनी नूह जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच संवेदनशील भागांत पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. गरज भासल्यास राखीव पोलिस दलाच्या तुकड्या रवाना करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

