जुन्नर / आनंद कांबळे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी तृणधान्यापासून निर्मित विविध पाककृतींचा समावेश आहारामध्ये व्हावा यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने पंचायत समिती जुन्नर च्या वतीने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे आज दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील पालक व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित सर्व मान्यवर व सहभागी स्पर्धकांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी पिंपळगाव जोगा केंद्राचे केंद्रप्रमुख संजय जाधव साहेब यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना संतुलित आहाराचे महत्व समजावून सांगितले. तर शालेय पोषण आहार अधिक्षक दत्तात्रय भारमळ यांनी जंक फूड खाण्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती देऊन पालक व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धकांनी तृणधान्यांपासून केलेले बाजरीचे पान केक’ गव्हाचा शिरा, नाचणीचे लाडू, नाचणीचे सुप, नाचणीचे थालीपीठ, वरई खीर, पराठा, मकाचटणी, लापशी, ज्वारीचे थालीपीठ, कोंड्याची वडी,तृण धान्याचे थालीपीठ इत्यादी विविध प्रकारचे पदार्थ स्पर्धेच्या निमित्ताने स्टॉलवर मांडलेले होते.

सदर स्पर्धेचे परीक्षण केंद्रप्रमुख संजय जाधव व सुरेश भवारी यांनी केले स्पर्धेच्या निकषानुसार योग्य प्रकारे परीक्षण करून प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे निवडण्यात आले प्रथम क्रमांक – सोनाली निलेश ठिकेकर शाळा – ओतूर नंबर – १ बाजरीचे पान केक व ज्वारीचे पौष्टिक फराळ, द्वितीय क्रमांक – शकुंतला काळे – शाळा ठाकरवाडी (गोळेगाव ) पराठा, मका चटणी, वरई भात तृतीय क्रमांक सौ.सुनीता सचिन गडदे शाळा – गोळेगाव कोंड्याची वडी नाचणीचे थालीपीठ अशाप्रकारे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे 5001, 3501, व 2501 देण्यात येणार आहे.
प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी हे बक्षीस जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, शालेय पोषण आहार अधीक्षक दत्तात्रय भारमळ, केंद्रप्रमुख संजय जाधव, सुरेश भवारी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सूर्यकांत माळी, सदस्य अरविंद बिडवई, छायाताई ढेकणे, बाळासाहेब मोरे, छाया वाळुंज, सविता उगले, राजश्री सदाकाळ, जयश्री गारे आदी मान्यवर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय उगले यांनी केले तर आभार किरण पवार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे नियोजन उमेश शिंदे व मारुती साबळे यांनी केले.