आताच 29 सप्टेंबर दिवस होऊन गेला, नेहमी प्रमाणे 29 सप्टेंबर दिवस आला आणि गेला. काहींना खैरलांजीची आठवण झाली असेल, पण आज काल लोकांना अशा घटना सामान्य वाटायला लागल्या आहेत. महाराष्ट्राला काळिमा फासणारी खैरलांजीची घटना हि 29 सप्टेंबर हा दिवस अनेक लोक काळा दिवस मानतात. हा काळा दिवस मानत असतानाच ज्या उत्तर प्रदेशाला देशात गुंडा राज म्हणून ओळखले जाते त्याच उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार आणि विकृत पद्धतीने केलेल्या या हत्याचा निर्भया, हैद्राबाद बलात्कार प्रकरण, कोपर्डी या घटनांसारखा निषेध होताना दिसत नाही.
दररोजच्या घडणाऱ्या घटनांनी लोकांचे मन आता दगड झाले आहे की, सवर्ण जातीतील मुलगी असेल तरच निषेध मोर्चे करायचे आणि न्याय मिळे पर्यंत आक्रमक व्हायचे का असा प्रश्न पडतो. हैद्राबाद बलात्कार प्रकरणामध्ये आरोप सिद्ध हि झालेला नसताना आरोपींचा शंकास्पद पद्धतीने एन्काऊंटर केल्या नंतर जनतेने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला मात्र हाथरस मध्ये सामूहिक बलात्कार आणि विकृत पद्धतीने जीभ कापून सुद्धा उत्तर प्रदेश पोलीस पंधरा दिवस होऊनही बलात्काराची खात्री करू शकत नाही या पेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकेल? ज्या मुख्यमंत्र्यांवर अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहे त्या “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ” कडून दुसरी काय अपेक्षा करू शकतो.
दोन दिवसांपूर्वी आश्रम वेब सिरीज पाहत असताना त्या सिरीज मध्ये दलितांवर होणारे अत्याचार पाहून मनात आले कि असे अन्याय अत्याचार आता कमी झाले आहे आणि सकाळी उठल्यावर हाथरस येथे झालेल्या विकृत घटनेने मन विचलित झाले.
खैरलांजी मध्ये संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं असताना देखील त्यांना अखेर पर्यंत न्याय मिळाला नाही, कुटुंबात जिवंत राहिलेला एकटा बाप भारतीय न्याय व्यवस्थेकडे न्याय मिळेल या आपेक्षेने जिवंत राहिलेल्या बापाने देखील अखेर प्राण सोडून दिला पण न्याय मिळाला नाही. मात्र त्या गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळाला या पेक्षा निर्लज्ज पणाचा कळस कोणता असेल? आता ज्या उत्तर प्रदेश मध्ये हि काळिमा फासणारी घटना घडली त्या उत्तर प्रदेश मध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर दलित, आदिवासींवर अन्याय अत्याचार वाढले आहे, अशा परिस्थतीत “गुंडाराज” कडून काय अपेक्षा करणार?
– विशाल पेटारे
– जुन्नर, पुणे