औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र हे सातत्याने अग्रेसर राहिले आहे. याला कारण म्हणजे आपल्या राज्याची भौगोलिक स्थिती, राज्यात वीज, पाणी आणि जमिनीची असलेली मुबलक प्रमाणातील उपलब्धता यासह आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षण संस्थांमुळे कुशल मनुष्यबळ यांचाही मोठा वाटा आहे. राज्यातील उद्योगस्नेही धोरणाबरोबरच, उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या विमानतळ, जेट्टी, यांच्यासह दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा आहेत. देशात सातत्याने उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रालाही कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
महाराष्ट्राचा अर्थचक्राला फिरतं ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे देश विदेशातून राज्यात येणारी राष्ट्र्रीय तसेच परकीय गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगारांचीही आवश्यकता आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मजुर, कामगार जे परराज्यातून इथे पोटापाण्यासाठी आले होते, ते मोठ्या प्रमाणात स्थालांतरित झाले. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. ही टाळेबंदी उठल्यानंतरही उद्योगांना पुर्वपदावर येण्यासाठी मोठे आव्हान होते ते कामगारांचे. याच आव्हानाचे संधित रुपांतर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाजॉब्सचा पर्याय राज्यासमोर ठेवला आहे.
उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांच्या आधारावर रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळीतपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार करून दि. 6 जुलै 2020 या दिवशी सुरू केले. याचेच आता महाजॉब्स मोबाइल एप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे. या महाजॉब्स ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले.
(क्रमशः)