Saturday, December 21, 2024
Homeजिल्हासमाजात ऐतखाऊंची संस्कृती आणि घामाची संस्कृती स्पष्ट दिसते - डॉ.श्रीपाल सबनीस

समाजात ऐतखाऊंची संस्कृती आणि घामाची संस्कृती स्पष्ट दिसते – डॉ.श्रीपाल सबनीस

पिंपरी चिंचवड : श्रमिकांचे रक्त आणि घाम समाजाच्या निर्मितीच्या सृजनसोहळ्यात समर्पित झालेले आहेत. कष्टाची भाकरी खाणारा कामगार संस्कृतीशी इमान राखतो. कामगारांच्या कष्टाला धर्म नसतो, तो इमानदार माणसांचा गोतावळा आहे, तरीही तो प्रत्येक युगात गरीबच का राहतो? त्याची उपेक्षा थांबत नाही, त्यांना किमान सुखाचे दिवस आले नाहीत, त्यामुळे समाजात ऐतखाऊंची संस्कृती आणि घामाची संस्कृती स्पष्ट दिसते, असे विचार जेष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाद सबनीस यांनी आकुर्डी येथे पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलनात व्यक्त केले.

श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

सुधीर बेडेकर : डाव्या पुरोगामी चळवळीतील एक सर्जनशील विचारवंत

मोठी खुशखबर ! महाराष्ट्र 1 एप्रिलपासून CNG स्वस्त

ते पुढे म्हणाले की, 12 व्या शतकात बसवेश्वरांनी, संत तुकाराम महाराजानी त्या काळच्या समाज व्यवस्थेत घाम गाळणाऱ्या श्रमिकांची दुःखे व्यक्त केली. शिवाजी महाराजांनी श्रमिक रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्तीसाठी लढाई केली. विद्यमान आधुनिक औद्योगिक समाजात संघटित कामगारांचा दबावगट आहे, त्यांच्या राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संघटना आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटले आणि सुटतात. परंतु असंघटित कष्टकरी समाजाच्या समस्या प्रलंबित राहतात. कारण त्यांच्या वेदना मोठ्या असूनही त्यांच्या छोट्या आणि वेगवेगळया संघटना आहेत. या असंघटीत श्रमिकांमध्ये 32 टक्के महिला आहे. शहरामध्ये 77 टक्के महिलांना, मजूरांना स्वतःचे घर नाही, महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आहे. ते आमदारांना घरे देतात, त्यांचे भत्ते वाढतात, मात्र असंघटित लोकांना काहीच न देणारे सरकार पुरोगामी विचारांचे आहे काय? असा टोलाही लगावला.

संपत्ती निर्मितीमध्ये सर्वात जास्त असंघटित आहेत, त्यांना आरोग्याच्या पूर्ण सुविधा नाहीत. मोठ्या दवाखान्यात जाण्यासाठी त्यांची आर्थिक कुवत नाही. कामगारांच्या कष्टाला धर्म नसतो, पण त्यांच्या घामाचे मूल्यांकन करून सरकारने त्यांना किमान समृद्ध जीवनासाठी विशेष व्यवस्था करावी. कष्टकरी साहित्य संमेलनातून त्यांच्या वेदना, दुःख शब्दबद्ध होईल, त्याच्या मुखातून जे गीत गायले जाईल, त्या गीताचा, कवितेचा आशय राजदरबारी कळावा. श्रमाचे मूल्य महात्मा गांधी, महात्मा फुले, बसवेश्वर, कार्ल मार्क्स, आंबेडकर यांच्या पर्वाने सन्मानित केले आहे. तेव्हा बुद्धीच्या कौशल्यावर श्रमिकांच्या घामाची संस्कृती विकसित व्हावी, असे श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

या संमेलनाचे उदघाटन कष्टकऱ्यांच्या अवजारांचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी जयभवानी एटरप्राजेस चे संचालक रंगनाथ गोडगे, जेष्ठ कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, सुर्वे साहित्य कला अकादमी चे अध्यक्ष सुदाम भोरे, माजी संमेलनाध्यक्ष तुकाराम धांडे उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय