पुणे : आप हाच एकमेव राजकीय पर्याय आहे, त्याला साथ देण्याची साद आम्ही जनतेला घालत आहे अशा शब्दात आज आप मधील पक्ष प्रवेशाचे समर्थन माजी खासदार हरिभाऊ राठोड व ॲड. धनराज वंजारी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये केले.
महाराष्ट्रातील मतदार एकूण राजकीय स्थिती आणि गोंधळ आणि स्वार्थाचे राजकारण पाहून एवढा वैतागला आहे. तो या प्रस्थापित पक्षांऐवजी ‘नोटा’ चे बटन दाबेल. अशा स्थितीत आम आदमी पार्टी पर्याय म्हणून पुढे येत आहे. विधानसभा अधिवेशना दरम्यान एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. परंतु, भवनामध्ये त्याची चर्चा नव्हती. फक्त खोका आणि बोका हीच चर्चा झाली. दुर्दैवाने सामान्य माणसाला वाली राहिलेला नाही. एक उत्तम पर्याय म्हणून मी अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आप मध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतर मला देशभरातून अभिनंदनाचे मेसेज येत आहेत. त्यामुळे आप ला उत्तम भविष्यकाळ आहे याची खात्री झाली.
भाजप ने त्यांच्या श्रीमंत मित्रांना साडेदहा लाख कोटीची कर्जमाफी दिली आहे. पण, सामान्य माणसाचा गॅस सिलिंडर महाग केला आहे. ओबीसी आरक्षण विषयी बोलताना झालेल्या गोंधळाबद्दल महाविकास आघाडी जबाबदार आहेच, परंतु भाजप सत्तेवर आल्यावरही त्यांनी हा गोंधळ वाढवला आहे, असे हरीभाऊ राठोड यांनी सांगितले.
मागील आठवड्यात माजी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. धनराज वंजारी यांनी सुद्धा आप मध्ये प्रवेश केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना वंजारी म्हणाले, अरविंद केजरवालांच्या आप ने राजनीती ची परिभाषा च बदलली आहे. आजवर राजनीती म्हणजे धर्माचं संस्थापना करण्यासाठीचे माध्यम आहे, तर काही पक्षांसाठी लोकशाहीचं कंपनीकरण करणे किंवा अहंकाराचा डंका पिटण्यासाठीचा मार्ग आहे. परंतु, यासाठी राजनीती केली जाते या कल्पनेला आप ने छेद दिला.
सामान्य माणसाकडून करापोटी मिळणाऱ्या पैसा त्यालाच व्याजासकट परत करणे म्हणजे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राजनीतीचा वापर करणे. समाज ज्ञान वर्धित करणे, उत्तम आरोग्य देणे,आणि रोजगार संधी या तीन मार्गाने आपने जनतेला हे देणे दिले. राजकारणाचा खरा अर्थ ज्यांना समजला आहे अशी सुजाण जनता आम आदमी पार्टीकडे मोठ्या अपेक्षेने पाहते आहे. हा पक्ष हल्लडबाजाचा नाही. सुज्ञ कार्यकर्त्याचा हा पक्ष आहे, म्हणून या पक्षाला साथ देण्याची साद मी तुम्हाला घालतो असे ॲड. धनराज वंजारी यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये आप मुळे वंचित घटकांना झालेला फायदा लक्षणीय आहे. मध्यमवर्गाच्या अस्वस्थतेचा आणि असमाधानाचा हुंकार म्हणून आम आदमी पार्टी पुढे आली. आज त्यात वंचितांच्या आकांक्षापूर्तीच्या आशा व्यक्त होत आहेत असे सुरुवातीला आपचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आपचे राज्य संघटक विजय कुंभार हेही उपस्थित होते.
तसेच वारजे माळवाडी येथे आप पुणे विभागीय – जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आप चे नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड व धनराज वंजारी यांच्या हस्ते झाले. विविध तालुका समन्वयक, पुणे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आप हाच राजकीय पर्याय असल्याने त्याला साथ द्या – हरिभाऊ राठोड
संबंधित लेख