Wednesday, February 5, 2025

जुन्नर : वारकरी समाजाच्या वतीने तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

जुन्नर : वारकरी समाजाच्या वतीने आज (दि.१२) रोजी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सकल संतमांदियाळीने समाजातील जातीयता नष्ट करत समाजातील एकोपा वाढवला. संत विचारांच्या प्रचार – प्रसारातून समाजातील सामाजिक जीवनाची प्रगल्भता शतकानुशतके वाढत आहे. सृष्टीचक्राच्या अनुकूल व प्रतिकूल काळातही समाजामध्ये धैर्य आणि स्थैर्य टिकवण्याचे कार्य संतवाङ्मयातून घडत आले आहे. शालीनता, कर्तव्यता, परोपकार सहचर्यता, सहिष्णूता, समन्वय ही सामाजिक मूल्ये संतांच्या विचारातूनच जोपासली जात आहेत. समाजातील अध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक जीवनाचे दर्शन संतांच्यामुळे घडत आहे.

तेव्हा अशा ह्या संत विचारांच्या मूल्यांची परंपरा म्हणजे आषाढीचा पायी वारी सोहळा, देव आणि संतांचे समारंभ व सोहळे आणि त्याची अनेक शतकांची परंपरा जी स्वकष्टाने स्वबळावर, सरकारचे अल्पस्वल्प स्वरुपात सहाय्य घेऊन शतकानुशतके अखंडित व अबाधितपणे चालू असलेली परंपरा सलग दोन वर्षे बंद आहेत. तसेच पायी दिंडी सोहळा देखील बंद आहे, हे कार्यक्रम शासनाच्या नियमा प्रमाणे चालु व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अमोल लांडे, जुन्नर तालुक्यातील युवा किर्तनकार ह.भ.प. दर्शन महाराज कबाडी, ह.भ.प. अर्जुन महाराज शिंदे , ह.भ.प. लक्ष्मण महाराज मुरकुटे, ह.भ.प. सुरेखा शिंदे, ह.भ.प. रामदास नथुराम शिंदे इ. उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles