Friday, December 27, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : समाजवादी प्रबोधिनीचा ४४ वा वर्धापनदिन, वसा त्यागाचा...वसा प्रबोधनाचा...

विशेष लेख : समाजवादी प्रबोधिनीचा ४४ वा वर्धापनदिन, वसा त्यागाचा…वसा प्रबोधनाचा…

मंगळवार ता. ११ मे २०२१ रोजी समाजवादी प्रबोधिनीचा ४४ वा वर्धापन दिन आहे. आज प्रबोधिनी पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आपण, आपला महाराष्ट्र आणि आपला देश कोरोनाच्या संकटांशी मुकाबला करत आहोत. यात प्रचंड मनुष्यहानी, वित्तहानीसह सर्वंकष नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे. या कालावधीत सर्वच क्षेत्रांची अतिशय अपरिमित हानी झाली आहे. अर्थातच त्याची झळ, फटका आपल्या प्रबोधनकार्यालाही बसला आहे. गेले दोन्ही वर्धापन दिन “लॉकडाऊन” मध्येच केवळ संवादात्मक रूपाने साजरे  करावे लागले आहेत. अर्थात ऑक्टोबर २० ते मार्च २०२१ या मधल्या काळात काळात आपण सर्वजण कोरोनाचे सर्व नियम पाळून इचलकरंजीसह सर्व शाखांवर नेहमीप्रमाणे अनेक कार्यक्रम घेतले. आपले ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकही नियमित पणे सुरू आहेच. पण या कोरोना काळाचे दृश्य,अदृश्य व अनिष्ट परिणाम आपल्याला या काळात भोगावे लागले आहेत, लागत आहेत. पण या संकटाशी योग्य पद्धतीने लढा देऊन आपण सर्वचजण लवकरच बाहेर पडू असा आशावाद आजच्या ४४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपण सर्वजण काळजी घ्या,सुरक्षित राहा. या लॉकडाऊन काळात जाहीर कार्यक्रम, बैठका सारेच स्थगित झाले आहे. अशावेळी आपण समाजमाध्यमांद्वारे समाजवादी प्रबोधिनी विचार पुढे न्याल, त्याचा विस्तार कराल, परीघ वाढवाल अशी खात्री आहे.

‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ’ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ख्यातनाम असलेल्या प्रबोधिनीची स्थापना थोर स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ विचारवंत आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने आणि इतर अनेक विचारवंत सहकाऱ्यांच्या मदतीने झाली. प्राचार्य ए.ए.पाटील, प्रा. डॉ.एन. डी.पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे, भाई ज्ञा.स.नार्वेकर, प्राचार्य म.द.देशपांडे, पी.बी.साळुंखे, ऍड. डी.ए. माने,बाळासाहेब पोतदार, वि.स.पागे, डॉ.अक्षय मोहंती, अनंतराव भिडे आदी अनेक मान्यवर यात सहभागी होते. संस्थेच्या स्थापनेपासून ३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश होईपर्यंत आचार्य शांताराम गरुड समाजवादी प्रबोधिनीचे काम अविरतपणे करत होते. १९८५ पासून म्हणजे गेली छत्तीस वर्षे प्रसाद कुलकर्णी समाजवादी प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्य करत आहेत. आचार्य शांताराम गरुड यांच्या पश्चात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने समाजवादी प्रबोधिनीचे काम वाढत्या उपक्रमशीलतेने सुरू आहे.

१९७५ साली आलेली आणीबाणी  राजकिय, सामाजिक कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून गेली. त्यांची मने सैरभैर झाली होती. तसेच १९६० नंतरच्या काळात राजकीय पक्षांच्या बांधणीतही दोष दिसू लागले होते. पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्रबोधनाचा अभाव होता. त्यामुळे समाजजीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढावी आणि जिज्ञासू कार्यकर्त्यांचे, समाजाचे प्रबोधन करावे या हेतूने हे अपक्षीय ज्ञानपीठ तयार झाले. भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत संकल्पनांची, राज्यघटनेच्या तत्वज्ञानाची, भारतीय संस्कृतीसह भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची आणि निरनिराळ्या इझमची (तत्वज्ञानांची) जाण असलेले, तशी मानसिकता तयार असलेले कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नागरिक प्रत्येक क्षेत्रात निर्माण करणे हा संस्थेचा स्थापनेपासूनचा मुख्य उद्देश आहे. हे कार्य अविरतपणे सुरू आहे. असे काम करणारी ‘समाजवादी प्रबोधिनी’ ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. १९९९  साली महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्य गौरव पुरस्कारही संस्थेला मिळाला आहे. तसेच इतरही अनेक पुरस्कार  मिळालेले आहेत.

गेल्या ४४ वर्षात व्याख्याने, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, अभ्यास शिबिरे, परिसंवाद, मेळावे  आदी स्वरूपाच्या सहा हजारांवर कार्यक्रमाचे आयोजन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे. इचलकरंजी या मुख्य केंद्राबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव या जिल्ह्यातील विविध शाखांच्या माध्यमातून हे काम अखंडपणे सुरू आहे. त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अतिशय मौलिक स्वरूपाचे योगदान असते. 

समाजवादी प्रबोधिनीच्या उपक्रमात विविध क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यवरांचा, अभ्यासकांचा, विचारवंतांचा मोठा सहभाग असतो. लोक प्रबोधनाचे सातत्यपूर्ण उपक्रम हे प्रबोधिनीचे  वैशिष्ट्य राहिले आहे. असे काम करणाऱ्या अनेक संस्था व चळवळी महाराष्ट्रात समाजवादी प्रबोधिनीच्या प्रेरणेतून तयार झाल्या याचा प्रबोधिनीला नेहमीच अभिमान आहे.

समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे नियमितपणे  “प्रबोधन प्रकाशन ज्योती” हे मासिक प्रकाशित केले जाते.  lSSN प्राप्त असलेल्या या मासिकात वर्षभरात अंदाजे नऊशे पृष्ठांचा सकस वैचारिक मजकूर अवघ्या तीनशे रुपयांच्या वार्षिक वर्गणीत घरपोच केला जातो. आजअखेर  ४०१ अंकाच्या माध्यमातून पंचवीस हजारांवर छापील पृष्ठांचा मजकूर लोकप्रबोधनार्थ प्रकाशित केला आहे.” पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना “हे या मासिकाचे वैशिष्ट्य आहे. कॉ. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता? , राजर्षी शाहू :वसा आणि वारसा, मंडल आयोग तसेच प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ?, महर्षी शिंदे :एक उपेक्षित महात्मा आणि आचार्य शांताराम गरुड यांचे भारतीय राज्यघटना यासह अनेक अभ्यासकांच्या गाजलेल्या पुस्तक -पुस्तिका ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती, मधूनच सर्वप्रथम प्रकाशित झाल्या आहेत याचाही मोठा अभिमान प्रबोधिनीला आहे. 

या मासिकाचे १९९० ते २०२१ ही अकरा वर्षे आचार्य शांताराम गरुड संपादक होते. तर २००२ पासून गेली एकोणीस वर्षे संपादक पदाची धुरा प्रसाद कुलकर्णी सांभाळत आहेत. प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संपादक मंडळात प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, प्रा. डॉ. भारती पाटील, प्रा.डॉ.ज.रा.दाभोळे हे सदस्य आहेत. तसेच प्राचार्य आनंद मेणसे यांच्यापासून दशरथ पारेकर व डॉ.नंदा पारेकर यांच्यापर्यंत अनेकांचे सातत्याने सहकार्य लाभत असते. या मासिकाचा वाचक वर्ग महाराष्ट्रभर पसरलेला आहे. जिज्ञासू – अभ्यासू वाचक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, सामाजिक -राजकीय कार्यकर्ते, नागरिक बंधू – भगिनी या साऱ्यांनाच हे मासिक अतिशय उपयुक्त ठरते असा अनुभव आहे. या मासिकाच्या कार्यावर मुंबई विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पीएच.डी व एम.फिल. झालेले आहे. तसेच या मासिकाचा समावेश अनेक विद्यापीठांच्या भाषा व सोशल सायन्सच्या संदर्भ यादीमध्ये दिसून येतो. गेल्या तीस वर्षांमध्ये विविध विद्यापीठातील शेकडो प्रबंधांमध्ये या मासिकाचा उल्लेख संदर्भ म्हणून केला गेला आहे. याचाही विशेष आनंद आहे.

१९८४ साली समाजवादी प्रबोधिनीने “प्रबोधन वाचनालय” सुरू केले. शासनमान्य अ दर्जा प्राप्त असलेल्या या ग्रंथालयात आजकथा, कादंबरी, ललित, काव्य, चरित्र, नाटक, समीक्षा, धर्म, राजकीय, वैचारिक अशा सर्व साहित्य प्रकाराची एकोणतीस हजार पुस्तके आहेत. त्यामध्ये समृद्ध असा संदर्भ विभाग आणि तीन हजारांवर पुस्तकांचा बाल विभागही आहे.या वाचनालयात दररोज अठरा दैनिके येतात. तसेच शंभरावर नियतकालिकेही येतात. या मोफत वाचन विभागाचा आणि ग्रंथ विभागाचा लाभ शेकडो वाचक घेत असतात. प्रबोधन वाचनालयाच्या वतीनेही विविध साहित्य, कला, सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जातात.

समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अनेक शाखेवर कार्यकर्त्यांची साप्ताहिक, पाक्षिक बैठक होत असते. त्यातून ताज्या घडामोडींवर चर्चासत्र होत असते.तसेच प्रासंगिक व्याख्याने, अर्थसंकल्प व्याख्यानमाला, संवाद -संभाषणक्षम कार्यकर्ता प्रशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता मोहीम, मतदार जागृती मोहीम, प्रायोगिक शैक्षणिक उपक्रम, प्रबोधन महिला मंच, विविध भाषा शिक्षण वर्ग, बांधकाम कामगार प्रशिक्षण वर्ग, दिवाणजी व जमाखर्च प्रशिक्षण वर्ग, ग्रंथालय प्रशिक्षण वर्ग यासारखे अनेक उपक्रम राबवले गेले व राबवले जात आहेत. समाजवादी प्रबोधिनीच्या मुरगूड शाखेच्यावतीने १९८६ पासून  ‘मुरगूड’ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला घेतली जाते. तसेच किर्लोस्करवाडी शाखेच्या वतीने २०१२ पासून किर्लोस्करवाडी येथे ‘आचार्य शांताराम गरुड व्याख्यांमला’ घेतली जाते. शिवाजी विद्यापीठा पासून विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमानेसुद्धा समाजवादी प्रबोधिनीने आजवर शेकडो उपक्रम घेतलेले आहेत. वृत्तपत्र लेखक संघ, अल्कोहोलिक ॲनॉनिमस, रंगयात्रा नाट्यसंस्था यासारख्या अनेक संस्था – संघटनांना समाजवादी प्रबोधिनीचे सातत्यपूर्ण सक्रीय सहकार्य असते.

समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यात प्रा.डॉ.एन. डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद माधव कुलकर्णी, प्रा. डॉ.जे.एफ. पाटील, शशांक बावचकर , प्रा. डॉ. भारती पाटील, प्राचार्य. डॉ.टी. एस. पाटील, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, प्राचार्य आनंद मेणसे ,प्रा.विजयकुमार जोखे, प्रा.शिवाजीराव होडगे, बी.एस खामकर, प्राचार्य डॉ.सुनील हेळकर, डॉ. चिदानंद आवळेकर, राहुल खंजिरे, सौदामिनी कुलकर्णी, प्रा.डी.डी.चोगुले, व्ही वाय ( आबा ) पाटील,प्रा.अनिल उंदरे, मुकुंद वैद्य, प्राचार्य विश्वास सायनकर, प्रा.बी.आर.जाधव, मोहनराव केळुसकर, उज्जला दळवी, दशरथ पारेकर, ऍड.अजित सूर्यवंशी, प्रा.नवनाथ शिंदे, प्रा.भास्कर कदम, एम.एस.चौगुले, जयकुमार कोले, प्रा.शांताराम कांबळे, प्रा.डॉ.काशिनाथ तनंगे, संजय संकपाळ, तानाजी पोवार, सुनील इनामदार, के.एस.दानवाडे, अस्लम तडसरकर, प्रा.रमेश लवटे, अन्वर पटेल, पांडुरंग पिसे, प्रा.अप्पासो कमलाकर, बबन बारदेस्कर, समीर कटके, माधवराव मोहिते, मारुती शिरतोडे, प्रा.डॉ.त्रिशला कदम, राजाराम माळी, हणमंतराव गाडगीळ, ऍड.दशरथ दळवी, प्रमोदकुमार पाटील, रमेश माणगावे, विजय मांडके, प्रा.डॉ.बाबुराव गुरव, प्रा.डॉ.भालबा विभूते यांच्यासह अनेकांचे मोठे योगदान आहे. नावे लिहिण्याची मर्यादा असल्याने सर्वांचीच नावे लिहू शकत नाही याबद्दल क्षमस्व. पण विविध शाखांतील अनेकजण आणि अनेकजण व्यक्तिगतही समाजवादी प्रबोधिनीचे कार्य व्यापक व्हावे यासाठी सातत्याने कार्यरत असतात. लोकप्रबोधनाचे हे कार्य संघटितरूपाने सुरू आहे, ही अभिमानाची बाब आहे.

प्रबोधन चळवळीपुढील आव्हाने वाढत असतांना हे काम अधिक लोकसहभागाने करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच ज्या मंडळीना समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी जरूर संपर्क करावा. संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी मोठा खर्च येत असतो.आपण स्वतः आर्थिक मदत करावी आणि इतरांकडून मिळवूनही द्यावी ही आग्रहाची विनंती आहे. तसेच प्रत्येक जिज्ञासू बंधू – भगिनीने “प्रबोधन प्रकाशन ज्योती” मासिकाचे वर्गणीदार वाचक व्हावे. आणि इचलकरंजी परिसरातील मंडळींनी या मासिकासह ‘प्रबोधन वाचनालयाचे’ ही सभासद वाचक व्हावे, असे या ४४ व्या वर्धापनदिनी नम्र आवाहन करतो. आपल्या सक्रिय सहभाग व सहकार्याच्या प्रतीक्षेत आहे.

– प्रसाद कुलकर्णी

– इचलकरंजी

लेखक “प्रबोधन प्रकाशन ज्योती” चे संपादक आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय