सिंधुदुर्ग, दि. २१ : आशा व गटप्रवर्तकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सिटू संलग्न) नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.
जिल्ह्यात जमावबंदी व मनाई आदेश असताना आशानी आंदोलन केले, म्हणून सिंधुदूर्गनगरी पोलिसांनी जिल्हा व तालुका कमिटीच्या सदस्यांना ताब्यात घेऊन, ओरोस पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
15 जून पासून आशा व गटप्रवर्तक यांच्या न्याय मागण्यासाठी सुरू असलेल्या बेमुदत संप आंदोलनाचा पुढील भाग म्हणून आज 21 जून रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सिटूचे राज्य उपाध्यक्ष प्रा. कॉ. आबासाहेब चौगुले, जिल्हा सचिव कॉ. विजयाराणी पाटील, अध्यक्षा कॉ. अर्चना धुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाची स्थिती, लॉकडाउन व एसटी बसेस बंद असून सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त आशा आपापल्या गावातून खाजगी मिनीबस मधून घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या. आंदोलनात सहभागी आशानी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर आपल्या मागण्यांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.
■ आशा व गटप्रवर्तकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
● सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा.
● आशा व गटप्रवर्तकाना आरोग्य कर्मचारी म्हणून केले पाहिजे.
● आशाना १८,००० रू. व गटप्रवर्तकाना २२,००० रू. वेतन मिळाले पाहिजे.
● आशा व गटप्रवर्तकाना प्रतिदिन ३०० रू. कोविड भत्ता मिळाला पाहिजे.