मुंबई : पोलीस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
विधानभवनात महिलांविषयक तक्रारीसंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक पार पडली. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक (महिला विरोधी अत्याचार प्रतिबंधक) राजवर्धन, संबधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला दक्षता समित्यांनी प्रभावीपणे कामकाज करावे याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस न झालेल्या बैठका ऑनलाईन स्वरूपात घ्यावात. बालविवाह, पोटगी, सोशल मीडियामधून वेबसाईटवरून होणारी महिलांची फसवणूक, ऊसतोड कामागार जेव्हा कामाकरिता स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्या अल्पवयीन मुलींकरिता आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे, त्यांच्या काही तक्रारी आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटनांचा तात्काळ तपास होणे गरजेचे आहे. जात पंचायतींकडून होणाऱ्या काही घटनांमध्ये तक्रारी येत आहेत वरील सर्व बाबतीत महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या.