मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने नंदुरबार येथे १० फेब्रुवारी रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . या मोर्चाच्या अनुषंगाने राज्यभरात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाची प्रचार मोहीम सुरू आहे. नंदुरबार येथील महाराणा प्रताप चौकातून सुरू होणाऱ्या मोर्चात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ व राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी दिली.
• आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
१. आदिवासींच्या हक्काची विशेष नोकर भरती तत्काळ सुरू करावी. आदिवासींच्या जागा बळकावलेल्या बोगसांवर कायदेशीर कारवाई व्हावी.
२. उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली अनुसूचित जमातीच्या ७५००० हजार रिक्त जागांची भरती सुरू करावी.
३. आदिवासी वसतिगृहांतील सर्व प्रश्न तात्काळ सोडवावेत. भोजनासाठी DBT योजना रद्द करून मेस (खानावळ) पद्धती सुरू करावी. महागाई निर्देशांकानुसार शैक्षणिक साहित्य, भत्ता व इतर खर्चाच्या निधीत वाढ करण्यात यावी.
४. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आदिवासी मुलामुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत. आदिवासी मुलामुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करावीत. वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना मोफत MSCIT व टंकलेखन कोर्सेस सुरू करावेत.
५. आश्रमशाळा, वसतिगृहे व आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावी.