Wednesday, February 12, 2025

हिरडा नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री यांची अमळनेर येथे भेट

जळगाव : हिरडा नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेचे हितचिंतक यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची अमळनेर, जिल्हा जळगाव येथे भेट घेवून हिरडा नुकसान मिळावी अशी मागणी करत निवेदन सादर केले.

राज्यात जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेती पिकांचे फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले होते. 

विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला होता. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचे ही यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

सदरील नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. व नुकसान भरपाई विषयी अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. ही नुकसान भरपाई मिळावी, यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्यपूर्ण जनआंदोलन व प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे.

नुकतेच दि.१९ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालय, मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे अध्यक्षते खाली बैठक आदिवासी विकास विभागात पार पडली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व  मदत, पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील इ.उपस्थित होते.

हिरडा नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असे तीनही कॅबिनेट मंत्री यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वासित केले होते. परंतु ही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. 

या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच अमळनेर येथे किसान सभेचे हितचिंतक यांनी भेट घेवून, हिरडा नुकसान भरपाई आदिवासी भागातील शेतकरी बंधू – भगिनींना मिळावी अशी विनंती केली व यावेळी किसान सभेच्या वतीने निवेदन ही देण्यात आले.

अमळनेर, जिल्हा जळगाव येथील रहिवाशी असलेले व किसान सभेचे हितचिंतक असलेले डॉ.अतुल चौधरी, डॉ. प्रशांत देवरे, व डॉ.दिनेश पाटील यांनी मंत्रीमहोदय यांना हे निवेदन देवून हिरडा नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी केली.  यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ते सहकार्य करू असे नमूद केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles