नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board) लवकरच ग्रुप डी च्या एक लाखाहून अधिक पदांच्या भरतीसाठी परीक्षेची तारीख जाहीर करणार आहे. रेल्वे ग्रुप डी परीक्षेची तारीख एप्रिलच्या सुरूवातीस जाहीर केली जाईल. या भरतीच्या अधिसूचनेनुसार एप्रिल ते जून या कालावधीत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
आरआरबी ग्रुप डी परीक्षेची तारीख रेल्वे भरती मंडळाच्या सर्व प्रादेशिक वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना आपल्या प्रदेशातील आरआरबी वेबसाईट्सवर भेट देऊन परीक्षेशी संबंधित प्रत्येक माहिती मिळू शकेल.
अनेक टप्प्यात होणार परीक्षा
आरआरबी एनटीपीसीप्रमाणे ही परीक्षा देखील अनेक टप्प्यात घेण्यात येईल. या परीक्षेसाठी अडीच कोटी विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. आरआरबी ग्रुप डी प्रवेश पत्र रेल्वेच्या सर्व परीक्षेच्या तारखा परीक्षेच्या चार दिवस आधी दिले जाईल. परीक्षेची तारीख, शहर, शिफ्ट डिटेल आणि प्रवेश पत्र तपासण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.
परिक्षा पॅटर्न
● ग्रुप डी च्या कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातील. सीबीटी 100 गुणांचे असेल.
● परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल, 3 प्रश्नांची उत्तरे चुकल्यास 1 गुण कापला जाईल.
● उमेदवारांना परीक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
परीक्षेला या टॉपिक्सवर असतील प्रश्न
● गणित : 25 प्रश्न
● जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग : 30 प्रश्न
● जनरल सायन्स : 25 प्रश्न
● जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स : 20 प्रश्न
आरआरबी एनटीपीसी फेज 6 ची परीक्षा उद्यापासून
सध्या रेल्वे एनटीपीसी परीक्षेचे आयोजन करीत आहे. आरआरबी एनटीपीसी फेज 6 ची परीक्षा 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सहाव्या टप्प्यातील परीक्षा 1, 3, 5, 6, 7 आणि 8 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत सुमारे 6 लाख उमेदवारांचा समावेश असेल. रेल्वे भरती मंडळाने फेज 6 च्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात