पिंपरी चिंचवड : जाधववाडी, चिखली या भागातील १५ वर्षाची अल्पवयीन मुलगीचा सहा महिन्यानंतर शोध लावण्यात जनवादी महिला संघटनेला यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जाधववाडी चिखली येथील अल्पवयीन १५ वर्षाची मुलगी हिला आरोपी देवा काटे याने फूस लावून पळवून नेली होती. सलग सहा महिने मुलगी सापडत नव्हती. मुलीची आई जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड संघटनेतील घरकामगार संघटनेची सदस्य होती. त्यामुळे अपर्णा दराडे यांनी विशेष निवेदनाद्वारे या मुलीला सुरक्षित पणे आईला परत द्यावी, या प्रकरणी आरोपी देवा काटे हॉटेल कर्मचारी याची सखोल चौकशी करावी, अशी विनंती आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे 24 नोव्हेंबर 2020 रोजी केली होती.
प्रथम याची तक्रार पिडीतेच्या आईने पोलीस चौकीत केली होती. परंतु कुदळवाडी पोलीस चौकीत तक्रार होऊनही दाद दिली जात नव्हती. त्यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. व मुलीला सुखरूप आईवडिलांंकडे सोपविण्याची मागणी केली होती.
स्थानिक नेत्याच्या संबंधिताचे हे हॉटेल असल्यामुळे गरीब अल्पवयीन मुलीला कामावर ठेवणे पण गुन्हा होता. कुदळवाडी येथील पोलीस चौकीचे तपास अधिकारी यांनी संवेदनशील तपास केला नाही. प्राथमिक तक्रारी (FIR) मध्ये आईने आरोपीचे नाव सांगूनही यांनी त्याचे नाव FIR मध्ये नोंद केले नाही. पोलीस अधिकारी या प्रकरणी योग्य तपास करत नाहीत. कोणाला तरी वाचवण्यासाठी वेळ काढू पणा करत आहेत, असे जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड किरणताई मोघे, अपर्णा दराडे आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांना लक्षात आल्यावर
राज्य पातळीवरील महिला नेत्या यांनी अधिक सक्रियता दाखवली.
मुलीच्या आईला आलेल्या एका फोनचा आधार घेत किरण मोघे समिती यांनी जनवादी महिला संघटनेच्या मुंबई अध्यक्ष सुगंधी फ्रान्सिस यांंना कळवले. श्रद्धा चाईल्ड हेल्पलाईन, उल्हासनगर या स्वयंसेवी संस्थेच्या ऍड.मनीषा तुळपुळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुलीला अंबरनाथ येथील एका चाळीत पाहिले, तिला कोंडून ठेवलेले होते. अशाप्रकारे संघटनेला एका मुलीला सापडण्यात यश आले.
सुगंधी फ्रान्सिस यांनी सांगितले की, अंबरनाथ येथील एका जागरूक महिलेने या मुलीचा नरकवास पहिला आणि तिने त्या मुलीला प्रचंड मानसिक सामर्थ्य देऊन तिच्या चिखली जाधववाडी येथील आईला संपर्क करून दिला. ती चाळीत राहणारी गरीब जागरूक महिला नसती तर या नरकातून ती मुलगी सुटली नसती. त्या सर्व कार्यकर्त्यांनी कायदेशीर पूर्तता करून अंबरनाथ येथे मुलीला शोधून बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे.
जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा अपर्णा दराडे म्हणाल्या, त्या अल्पवयीन मुलीचा शोध महिला संघटनेने लावला. मुलगी अंबरनाथ येथे 2 जून 2021 रोजी सापडली. चाईल्ड हेल्पलाईन, बालकल्याण समिती, ठाणे, ठाणे शहर पोलीस यांनी मदत केली. सदर मुलीला आरोपीने कोंडून ठेवले होते. लैंंगिक, मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला. पोलिसांनी सुरवातीला गांभीर्याने तपास केला नाही. मुलीच्या नरकवासाला जबाबदार कोण? पोलिसांनी फेरतपास करावा.
अपर्णा दराडे यांनी पुढे सांगितले की कुदळवाडी पोलीस चौकीचे तपास अधिकारी यांनी मुलीच्या आईने त्यावेळी आरोपीचे नाव सांगितले पण त्यांनी FIR मध्ये आरोपीचे नाव नोंदले नाही. या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशील तपास केला असता तर त्या मुलीचा लैंगिक, शारीरिक छळ झाला नसता. पोलीस कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आम्ही दिलीप वळसे पाटील यांना पुर्ण तपशीलासह निवेदन पाठवून या प्रकरणाचा तपास स्वतंत्र महिला पोलीस अधिकारी नेमून महाराष्ट्र शक्ती कायदयानुसार करावा, आणि सदर गरीब घर कामगार आईचे आणि अल्पवयीन मुलीचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे.
शहरात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ आणि हत्येच्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या मुलीचे बरे वाईट होऊ नये म्हणून जनवादी महिला संघटनेने या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला, त्यास यश आले असल्याचे दराडे म्हणाल्या.