जुन्नर / शिवाजी लोखंडे : शिवजन्मभुमी अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनचं उध्वस्त झालेलं शिवकालीन प्रवेशद्वार सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी लोकवर्णीच्या माध्यमातून पुन्हा उभारलं आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचा दुर्गार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
गेल्या तीन वर्षांमध्ये या प्रतिष्ठानने १४ किल्ल्यांची उध्वस्त झालेली प्रवेशद्वारं लोकवर्गणीच्या माध्यमातून पुन्हा उभी केली आहेत, त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला
जीवधन किल्ल्याचा कल्याण दरवाजा व त्या पुढील पायरी मार्ग इंग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केला होता. तेव्हापासून हा पायरीमार्ग दगड मातीने व्यापलेला होता. पायरी मार्गातला अडथळा दूर केल्याशिवाय प्रवेशद्वार बसवणे शक्य नव्हते म्हणूनच प्रतिष्ठानने प्रथम हे अडथळे दूर करण्याचा संकल्प केला. यानुसार नोव्हेंबर २०२० मध्ये प्रतिष्ठानने या कामाचा श्रीगणेशा केला.
प्रतिष्ठानच्या १५० ते २०० दुर्गसेवकांनी वर्षभर दर शनिवार व रविवार श्रमदान करून प्रवेशद्वाराच्या मार्गातील अडथळे दूर केले. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या दुर्गार्पण सोहळ्यात यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान व शिवजन्मभूमी विभागाचे शेकडो दुर्गसेवक उपस्थित होते. प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण होताच दुर्गसेवकांनी एकच जल्लोष केला. वर्षभर मेहनत घेऊन प्रवेशद्वार उभारल्याचे समाधान यावेळी दुर्गसेवकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
हेही वाचा ! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
गेल्या १३ वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग संवर्धनाचे काम करीत असून किल्ल्यांच्या साफसफाईच्या कामांमध्ये दुर्गसेवकांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे. तीन वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या विविध प्रकारच्या दुरुस्तीला परवानगी दिल्याने प्रतिष्ठानने तुंग, तिकोना, गोरखगड, कर्नाळा, तोरणा, सज्जनगड, सरसगड, सिंहगड, कोथळीगड, हरिहर, हडसर, रतनगड, त्रिगलवाडी, जीवधन या किल्यांवर उध्वस्त झालेलं प्रवेशद्वार बसवण्याचे कार्य केले आहे.
याबरोबरच सिंहगड, कुलाबा, वेताळवाडी, कोरलाई, औसा, पद्मदुर्ग, संग्रामदुर्ग, कोथळीगड, उंदेरी, चावंड, मंडणगड, बाणकोट, डहाणू, भुदरगड व पावनगड या किल्ल्यांच्या ३२ तोफांना सागवानी तोफगाडे उभारण्याचेही काम या प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी केले आहे.
हेही वाचा ! पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा नाही भीती वाटली; पंतप्रधान मोदींवर जोरदार टिका
जीवधन किल्ल्याचे प्रवेशद्वार सागवानी असून यासाठी दोन लाख रुपये तर किल्ल्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च आला. सह्याद्री प्रतिष्ठान, शिरूर यांच्या वतीने लोकवर्गणीतून हा निधी उभारण्यात आला. कोरोना काळात प्रतापगडचा बुरूज ढासळला होता. त्यावेळी देखील सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. पुरातत्व, वनविभाग तसेच माजी खासदार उदयनराजे यांची परवानगी घेऊन प्रतिष्ठानने ढासळलेला बुरुंज उभारण्यासाठी लोकसहभागातून २१ लाख रुपये जमा केले. पुरातत्व विभागाच्या कंत्राटदाराकडून बुरुंज उभारण्याचे काम केले.