पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:ओबीसी आरक्षण बचाव समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील ओबीसी बांधवांनी चिंचवड स्टेशन चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देऊ नये,अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही म्हणणारे सरकार मराठ्यांना सर्रास कुणबीचे दाखले देऊन ओबीसींना पुन्हा गांवकुसाबाहेर काढण्याचे काम करीत आहे आणि याविरुद्ध आवाज उठवणारे ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब व गोपीचंद पडळकर यांना टारगेट केले जात आहे,अशी खंत ओबीसी आरक्षण बचाव समिती अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांना तेली समाजाचे शहराध्यक्ष अनिल राऊत यांनी बोलताना म्हटले की,पुढच्या काळात जर ओबीसी समाजाला टार्गेट केलं तर जशास तसे उत्तर देण्यात येईल.
वंजारी समाजाचे युवा नेतृत्व वैजनाथ शिरसाट म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे जातीपातीचे राजकारण करून दोन समाजामध्ये वाद निर्माण करत आहेत.गेल्या काही महिन्यामध्ये अनेक आमदारांची घरे पेटवली हॉटेल पेटवली गेली येणाऱ्या काळात शांतता हवी असेल तर मनोज जरांगे यांना सरकारने अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी धनगर समाजाचे नेते व मल्हार आर्मीचे शहराध्यक्ष राहुल मदने,ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे,सत्यशोधक परिषदेचे माऊली बोराटे,सुधाकर फुले,ज्योती परदेशी आदि मान्यवरांनी निषेध व्यक्त करून मार्गदर्शन केले.खेमराज काळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या आंदोलनात गणेश खरात,राजाभाऊ धायगुडे,दादा शिंदे,कैलास जाधव,बाळासाहेब सोलंकर,राजकुमार परदेशी,नंदा करे,प्रदीप टोपे, रामभाऊ ठोके,शंकर लोंढे,अशोक पैठणकर,भरत कुंभार,मुरलीधर दळवी,निवृत्ती मोरे सह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.