पुणे : गेल्या काही महिन्यापासून एसटी सेवा सुरळीत नसल्याने याचा ग्रामीण भागातील वाहतुक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर पुणे जिह्यातील ग्रामीण भागात पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बससेवा सुरू केली आहे.
ग्रामीण भागात पीएमपीएमएल सुरू केल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत या बस सेवेला प्रचंड प्रतिसाद दिला. सातत्याने इंधनाचे दर वाढत असल्याने बहुतेक नागरिकांसाठी पीएमपी बससेवा सुरक्षित आणि उपयुक्तय ठरत आहे. नागरिक ग्रामीण भागातून शहरात येताना दैनंदिन 70 रुपयांचा पास काढत, मात्र आता पीएमपीएमएलने महापालिका हद्दीबाहेरील नागरिकांसाठी दैनंदिन 70 रुपयांचा आणि मासिक 1400 रुपयांचा पास बंद केला आहे. हे पास शुक्रवार 1 एप्रिलपासुन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेर पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे.
मार्ग लांब असल्याने तिकीट उत्त्पन्न महामंडळास कमी होत असल्याचे कारण देत आणि तोटा कमी करण्यासाठी पीएमपीएमएलने पास बंद केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना आता तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. पीएमपीएमएलच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पीएमपीएमएलचा दैनंदिन 70 आणि मासिक 1400 रुपयांचा पास बंद केला आहे. परंतू पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत फिरण्यासाठी असलेला दैनंदिन 40 रुपयांचा पास आणि पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिका हद्दीत फिरण्यासाठी असलेला 50 रुपयांचा पास सुरू राहणार आहे.