समाज माध्यमातून पत्रकारांबद्दल अपशब्द वापरुन केले बेताल वक्तव्य
निलेश देशमुख यांचा विविध संघटनांनी व्यक्त केला निषेध : देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा ; आयुक्तांकडे तक्रार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी समाज माध्यमातून पत्रकारांबद्दल अपशब्द वापरुन बेताल वक्तव्य केले आहे. या प्रकाराचा पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, पिंपरी चिंचवड यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच देशमुख यांना महापालिका सेवेतून तात्काळ हकालपट्टी करुन कार्यमुक्त करा, त्यांना शासन सेवेत परत पाठवा, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून सेवा पुस्तकांत नोंद करा, अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली.

याबाबत महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. सदरील निवेदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी स्विकारले आहे. यावेळी पवना समाचारचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, news18 लोकमतचे गोविंद वाकडे, आपला आवाजचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हाध्यक्ष अतुल परदेशी, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विकास शिंदे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण शिर्के, पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, पत्रकार गणेश हुंबे, मंगेश सोनटक्के, महिला पत्रकार संघटनेच्या अर्चना मेंगडे, माधुरी कोराडे, सीता जगताप, डिजिटल मिडियाचे गणेश मोरे, संजय राजगुरु, गौरव सांळुखे, राम बनसोडे, अविनाश अदक, राजू वारभूवन, विशाल जाधव, सुरज कसबे, सुरज साळवे, अशोक कोकणे, गोविंद देशपांडे, अशोक पारखे आदी पत्रकार उपस्थितीत होते.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन कार्यालयाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी समाज माध्यमातून पत्रकारांबद्दल अपशब्द वापरुन बेताल वक्तव्य केले आहे. त्यांनी शहरातील पत्रकारांना ‘या लांडग्याना’ रक्ताची चटक लागलीय, अशी उपमा देत सर्व पत्रकारांना ‘छचोर’ म्हटले आहे. शहरातील डिजिटल माध्यमातील पत्रकारांना प्रवेश निषिध्द केला पाहिजे, असे म्हणत सर्व पत्रकारांबद्दल अपमानास्पद बोलून संतापजनक बेताल वक्तव्य केले आहे. या प्रकाराचा पिंपरी-चिंचवडच्या सर्व पत्रकार संघटनाच्या वतीने निषेध व्यक्त करतो.

महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडिया, रेडिओ, इलेक्ट्राॅनिक माध्यमांच्या आस्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेण्याचा प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली. तसेच डिजिटल मिडियाला शासनाच्या कक्षेत घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून धोरण ठरविले जात आहे. देशमुख यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल कडक कारवाई करावी, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याकडे तक्रार केलेली आहे.
दरम्यान, करसंकलनचे सहायक आयुक्त निलेश देशमुख हे डिजिटल मिडियाच्या पत्रकारांबद्दल अपमानास्पद बोलून संतापजनक बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्या वक्तव्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांविषयी समाज माध्यमात चुकीचा संदेश जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील सनदी अधिका-यांच्या समाज माध्यम ग्रुपवर देशमुख यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. या प्रकाराबद्दल करसंकलनचे सहायक निलेश देशमुख यांनी सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागावी, आयुक्तांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून, तशी त्यांच्या सेवापुस्तकांत नोंद करावी, महापालिका सेवेतून हकालपट्टी करुन तात्काळ शासन सेवेत परत पाठवावे, अन्यथा पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, पिंपरी-चिंचवड वतीने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, सदरील प्रकरणात तातडीने लक्ष देवून दोन दिवसात योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे.


