Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कष्टकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे झाले काय, आमच्या हाती आले काय ? आंदोलन

PCMC : कष्टकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे झाले काय, आमच्या हाती आले काय ? आंदोलन

टपरी, पथारी, हातगाडी पंचायत महापालिका प्रशासनाला विचारणार जाब (PCMC)

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या महापालिकेवर आंदोलन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : टपरी पथारी हातगाडी, धारक फळभाजी विक्रेते, यांच्यावर होणाऱ्या सततच्या कारवाई विरोधात तसेच सर्वांना परवाना मिळावा. पक्क्या गाळ्यांमध्ये पुनर्वसन व्हावे, यासह विविध मागण्यांसाठी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवारी दुपारी पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर हे आंदोलन होणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली. (PCMC)

बाबा कांबळे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील गोरगरीब, कष्टकरी, बहुजन, मागासवर्गीय कष्टकरी शेतमजूर यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणपणाने लढा दिला. आता अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. परंतु स्वातंत्र्य काळामध्ये गोरगरीब कष्टकरी, मागासवर्गीय, बहुजन यांच्या अवहेलना चालूच आहेत. श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, टपरी, पथारी हातगाडी धारकरकांवर सतत अन्यायकारक कारवाई होत आहे.

टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या बाजूने २००७ रोजी देशातील पहिला कायदा मंजूर झाला. हा कायदा होण्यासाठी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने नमती भूमिका घेतली. देशातील पहिला कायदा मंजूर केला. परंतु आजही या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. हातावर पोट असणाऱ्या घटकांवर अन्याय सुरू आहे. या अत्याचाराच्या विरोधामध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आवाज उठवण्याचा निर्णय टपरी, पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने घेण्यात आला आहे.

स्वातंत्र्याचे झाले काय ? असा प्रश्न घेऊन आमच्या हाती स्वातंत्र्य आलेच नाही, याचा जाब प्रशासनाला विचारला जाणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या

१) पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये.
२) 2023 मध्ये सर्वेक्षण झालेल्या सर्व लाभार्थ्यांना तातडीने परवाना द्या.
३) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पात्र टपरी, पथारी, हातगाडी, फळभाजी विक्रेते यांचे पक्क्या गळ्यात पुनर्वसन करा. त्या ठिकाणी लाईट, पाणी, स्वच्छता गृह आदी सुविधा द्या.
४) फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा.
५) टपरी पथारी हातगाडी धारकांना सामाजिक सुरक्षा द्या.
६) पीएम स्वनिधीद्वारे एक लाख रुपये कर्ज व त्यात 50 टक्के अनुदान सुरू करा.
७) टपरी, पथारी, हातगाडी धारकांना आरोग्य विमा अपघाती विमा व इतर कल्याणकारी योजना सुरू करा.
८) शहरात प्रथम व सर्वात मोठी संघटना म्हणून टपरी, पथारी; हातगाडी पंचायत या संघटनेस विश्वासात घ्या.
९) स्मार्ट सिटी व स्ट्रीट वेंडर्स योजने अंतर्गत शहरातील सर्व हातगाडी व टपरीधारकांना महापालिके मार्फत आधुनिक पद्धतीने हातगाडी व स्टॅन्ड उपलब्ध करून द्या. इतर विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय