स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचा संवेदनशील व अभिनव उपक्रम (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – गेली दोन वर्षापासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य योजना’ यशस्वीपणे राबवली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य निधी अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या मराठी शाळांमधील आर्थिक दुर्बल, एकल पालक असलेल्या गुणवंत मुलांची शालेय फी मंडळातर्फे भरण्यात येते. (PCMC)
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता एकूण ६ शाळांमधील अशा ७० गरजू विद्यार्थ्यांची तसेच ६ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड करून शैक्षणिक निधी वाटपाचा कार्यक्रम शनिवार दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी येथे संपन्न झाला.
यंदाचे ह तिसरे वर्ष होते. आत्तापर्यंत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनवणे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अनिल झोपे, उद्योजक व प्रमुख वक्ते डॉ. मनोज देवळेकर सर, ज्ञान प्रबोधिनी केंद्रप्रमुख हे उपस्थित होते.
डॉ. देवडेकर सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भरपूर अभ्यास करण्याचा तसेच भरपूर खेळण्याचा सल्ला दिला. त्यांनी मुलांसमोर डॉ. रघुनाथ माशेलकरांचा संपूर्ण जीवनपट अतिशय सोप्या भाषेत ठेवला.
डॉ. रघुनाथ माशेलकरांसारखे तुम्ही सुद्धा शिक्षण घेण्यासाठी समाजाने केलेल्या आर्थिक मदतीची जाण ठेवून आणि ज्यावेळी आपण स्वतः सक्षम होऊ त्यावेळेस आपल्या सारख्याच गरजू विद्यार्थ्यांची मदत करून मदतीची परतफेड कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री अनिल झोपे यांनी मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
भारतमाता प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक डॉ. संगीता रानडे, गोविंद लाठकर यांनी पाहुण्यांचा व वक्त्यांचा परिचय करून दिला.
मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रमेश बनगोंडे यांनी या उपक्रमासाठी समाजातील दानशुरांनी सहभागी व्हावे असे आवाहन करीत देणगीदार, वक्ते व पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
सूत्रसंचालन विकास देशपांडे यांनी केले व शैक्षणिक निधीसाठी देण्यासाठी देणगीदारांनी ९९७५९८८५५१ त्या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी मंडळाचे सचिव सागर पाटील, सहसचिव राजेंद्र देशपांडे, कार्यकारिणी सदस्य प्रदीप पाटील, श्रीराम रानडे, वैदेही पटवर्धन तसेच मंडळाचे कार्यकर्ते, लाभार्थी विद्यार्थी, पालक, पिंपरी चिंचवड मधील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत मातेच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.