महापालिका चॅरिटेबल ट्रस्टची आर्थिक मदत देण्याची सूचना (PCMC)
महापौर अभावी रुग्णांसह नातेवाईकांना अर्थसहाय्य मिळेना
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना मिळणारी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत बंद झाली आहे. सदर अर्थसहाय्य महापौरांच्या स्वाक्षरीने देण्यात येते. मात्र, आता महापौर नाहीत, तर आयुक्तांच्या स्वाक्षरीने अर्थसहाय्य करावे, अशी सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. (PCMC)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरातील सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकर रुग्णांना आर्थिक मदत व्हावी. या उद्देशाने दि. 4 सप्टेंबर 1991 रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे वैद्यकीय मदतीसोबतच नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्तीमध्ये गोरगरिबांना मदत करण्याचे धोरण आहे.
सदर चॅरिटेबल ट्रस्टसाठी महापौर यांची पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नियुक्त होत असते. मात्र, मार्च- 2022 मध्ये महानगरपालिकेची मुदत संपली आहे. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना यामुळे निवडणुका पुढे गेल्या आहे. परिणामी, महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. (PCMC)
‘‘महापौर’’ अभावी गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी 5 हजार रुपये आर्थिक मदत मिळत नाही. मदतीच्या धनादेशावर महापौरांची स्वाक्षरी लागते. गेल्या तीन वर्षांपासून महापौर दालनाला टाळे आहेत. तसेच, महानगरपालिकेच्या जानेवारी- 2022 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत आर्थिक मदतीची रक्कम 5 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपयांवर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, सदर प्रस्तावावरही अद्याप कार्यवाही झालेली नाही. सदर प्रस्तावावर कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.
प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना आर्थिक मदत मिळण्याचा उपक्रम अविरत सुरू रहावा. त्यासाठी महापालिका अधिनियमातील संबंधित अटी-शर्तीच्या आधारे नवीन महापौर नियुक्त होईपर्यंत आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपल्या स्वाक्षरीने किंवा अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीने रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी प्रशासनाला केली आहे. त्या दृष्टीने कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : गोरगरिब रुग्णांच्या अर्थसहाय्यासाठी आमदार लांडगे सरसावले!
---Advertisement---
- Advertisement -