पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातील नदी व तलावांचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मूर्ती संकलन केंद्रात जमा करावी किंवा गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदात घरगुती, लहान गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आले. (PCMC)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १४, ९, ४, ६, ८, १४, ८ आणि १६ अशा एकूण ७९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
यावेळी ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता राखावी, रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करावे, जमा होणाऱ्या कच-याचे सुयोग्य नियोजन करावे, उखडलेले पेव्हिंग ब्लॉक नव्याने बसविण्यात यावेत, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक बसवावा, रस्त्यांवरील खड्डे वेळोवेळी बुजवावेत अशा तक्रारी वजा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या. (PCMC)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली असून मुर्ती संकलन केंद्रांचीही स्थापना करण्यात आली आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या विघटन केंद्रांवर रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने मुर्तींचे विघटन करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी नदी व तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी महापालिकेच्या कृत्रिम हौदांचा वापर करावा अथवा मुर्ती संकलन केंद्रांमध्ये गणेशमूर्ती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
***
**
***
***
***
***
***
**”
***