दुर्गंधीयुक्त, मैला मिश्रित पाण्याच्या डोहातच स्वातंत्र्य दिन साजरा !
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : कृष्णानगर, चिंचवड येथील भीमशक्तीनगर येथील लोकवस्तीमध्ये ड्रेनेजमधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त मैलापाणी महापालिकेच्या शाळा समोरून वाहत आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
परिसरातील संपूर्ण ड्रेनेजची लाईन दारातून जाते. मात्र, ही ड्रेनेज लाईन सतत तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी दारापुढे येते. या पाण्यामुळे घरातून बाहेर देखील निघणे शक्य होत नाही. ड्रेनेज लाईन तुंबून चेंबरमधून मैला मिश्रित पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, त्याचा परिणाम स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. यामुळे रस्त्यावर घाण साचत असून, वाहनचालक घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना देखील सांडपाण्यातून वाट काढत चालावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन, त्वरित दुरुस्ती करावी.
ड्रेनेज शेजारी वस्ती असून, या पाण्यामुळे तेथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सध्या शहरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. अशातच सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

‘‘संबंधित अधिकाऱ्यांना अशा तक्रारी संबंधात फारसं गांभीर्य नसल्याचे दिसून येते. कारण फ क्षेत्रीय कार्यालय परिक्षेत्रात अनेक ठिकाणी ही समस्या निदर्शनास येत आहे. चेंबरमधून मैला मिश्रित पाणी वाहत आहे. परिसरात दुर्गंधी पसरते, रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महात्मा फुलेंनगर, कृष्णानगर येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत कन्हेरे यांनी सांगितले की, प्रशासकीय राजवटीत नागरी सेवा, सुविधा व्यवस्थापन, स्वछता अभियान याबाबत मनपाच्या प्रशासकिय कारभारात गलथानपणा वाढला आहे. प्रशासनाने या ठिकाणी स्वछता अभियान राबवावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.