पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज् व प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज् येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रा. नामदेवराव जाधव, प्रसिद्ध उद्योजिका हेमा राचमाले, प्रायार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी, डॉ.वनिता कुर्हाडे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरीया, प्रा.रोहित आकोलकर, प्रा.अश्लेषा देवळे, प्रा. पांडुरंग इंगळे उपस्थित होते. तर, प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे इतिहास संशोधक प्रा.डॉ.प्रमोद बोराडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी एम.बी.ए.चे संचालक डॉ.सचिन बोरगावे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पोर्णिमा कदम उपस्थित होत्या. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
व्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले याबाबत सखोल माहिती देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सकलजनांचा एकत्रित विचार कसा केला. ऐक्य व एकोपा घडवून आणला. रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याचा राज्य कारभार कसा केला, बुद्धीजीवीवर्ग विकसित केला.स्त्रीयांची आत्मप्रतिष्ठा जपण्यासंदर्भात शास्त्र समजावून घेवून आरमाराची उभारणी कष्टकरी शेतकर्यांकडून स्वदेशी आरमार बोटी तयार केल्या आदींची सखोल माहिती दाखल्यासहीत युवा वर्गांना दिली. कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा यांनी शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले. हा स्तुत्य उपक्रम महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आला. त्याचे अनुकरण इतर शिक्षण संस्थांनी देखील करावा. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी व एखाद्या परदेशी भाषेवर प्रभुत्व मिळवून आयुष्यात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. पुस्तकाचे वाचन व चिंतन करावे.प्रत्येकाने आयुष्यात समझोता करायला शिका, स्वतःसाठी न जगता इतरांचा विचार करा, वेळेचे अचूक व्यवस्थापन व नियोजन करा. एखाद्या विषयात नापास झाला तरी नाउमेद न होता. सकारात्मक आयुष्य जगा, जे येते त्यावर प्रभुत्व मिळवा. लक्षात ठेवा करीअर कशातही करता येते, त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. जिज्ञासा, जागृती, उत्कर्षाची कास अंगिकारा, प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. आपले वर्तन, राहणीमान यातून यश प्राप्त करता येते, त्यासाठी माणसे जोडायला शिका, आचार विचारांची आदान-प्रदान करा.
इतिहास संशोधक प्रा.डॉ.प्रमोद बोराडे मार्गदर्शन करताना म्हणाले, तुम्ही एम.बी.ए., एम.सी.ए, त करीअर करणार आहात त्या अनुषंगाने प्रत्येकात गुणवत्ता असली पाहिजे.तुमची फसवणूक होणार नाही, यासाठी स्वतः दक्ष राहिले पाहिजे. सभोवतालचे ज्ञान आत्मसात करा.त्यामुळे प्रगल्बता येते. जिजाऊ राजमाताने छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले.राजा सहजासहजी तयार होत नाही. त्यासाठी शिवरायांनी टोकांचा संघर्ष केला. त्याचा इतिहास प्रत्येकाने वाचून त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजे. आव्हानांना न घाबरता, डगमगता त्याला सामोरे जात यशस्वी कसे होईल याची कास अंगिकारा, लक्षात ठेवा नियोजन शिवाय यशस्वी होता येत नाही. जातीजातील भिंती वाढणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयापासून दूर राहिले पाहिजे. भारत मातेला अपेक्षित चारित्र्यवान पिढी आजची आहे का? असा सवाल करून याचा स्वतःच विचार करा, गुणवत्तेत, साधनामध्ये कोठे कमी पडतो,याचा विचार करून राष्ट्रावर नितांत प्रेम करत इतरांचा देखील सन्मान करा.असे आवाहन केले.
प्रस्तावना एम.बी.ए.चे संचालक डॉ.सचिन बोरगावे यांनी केले. या दोन कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले.