पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – अल्पसंख्यांकांच्या सर्वाजनिक विकासासाठी भारतीय संविधानाची अंमलबजावणी करावी, त्यातूनच अल्पसंख्याकचा सर्वांगीण विकास होऊ शकेल असे प्रतिपाद पुर्व आयपीएस अधिकारी व लेखक अब्दुर रहमान यांनी पिंपरी येथे आयोजित संविधान सुरक्षा संमेलनात व्यक्त केले. (PCMC)
नॅशनल कॉन्सफरन्स फॉर मायनॉरिटी व पिंपरी चिंचवड मुस्लिम जमात यांच्या संयुक्त विद्यमाने राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सुरक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक म्हणून अब्दुर रहिमान, प्रमुख पाहुणे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
मुस्लिम समाजाने संविधानाची प्रत विकत घेवून त्याचे वाचन करून त्यातील तरतूदींचा अभ्यास करावा. तसेच शिक्षण, व्यक्तीची प्रतिष्ठा व सामाजिक सुरक्षा यासाठी कायदेशीर संघर्ष करावा व प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठाऊन न्याय मिळावावा अशी भुमिका अब्दुर रहिमान यांनी मांडली.
यावेळी बोलताना ॲड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले की, भारतीय संविधान लिहित असताना अल्प संख्यांकासाठी तरतूद करता यावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. सध्या अल्पसंख्यांक समूह विशषत: मुस्लिम आपल्या आंदोलनाला संविधानिक कवच देत आहेत. (PCMC)
भारतीय संविधान अर्पण केल्यापासूनच कठोरतावादी लोकांनी संविधान मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्याचे केंद्रीय सरकार धार्मिक भेदभाव करणारे असून ते हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते आहे. त्यांच्यामुळे देशाला धोका निर्माण झाला असून देशातील अल्प संख्यांक समाज असुरक्षित झालेला आहे. संविधानवादी कार्यकर्ते म्हणून भारताला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही अशी भुमिका राहुल डंबाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडली.
संमेलन आयोजनात पिंपरी चिंचवड मुस्लिम जमातीचे हाजी युसूफ कुरेशी, हाजी गुलाम रसुल, शहाबुद्दीन शेख व याकुब शेख यांनी सहभाग घेतला होता.