Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : डेंग्यूच्या अळ्या सापडल्या, १ हजार ४५० घरांमध्ये, दंडात्मक कारवाई...

PCMC : डेंग्यूच्या अळ्या सापडल्या, १ हजार ४५० घरांमध्ये, दंडात्मक कारवाई सुरू

मनपाने केला ७२ हजार दंड वसूल ; डासांच्या आळ्या आढळळेल्या ५८५ आस्थापनांना नोटीस PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महापालिकेच्या किटकनाशक आणि औष्णिक धुरीकरण विभागाच्या वतीने १ ते २२ जून २०२४ या कालावधीत केलेल्या तपासणीत शहरातील विविध ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने १४ जणांवर “डास उत्त्पत्ती स्थानांची निर्मिती” या शिर्षकाखाली दंड प्रमाणांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. PCMC

तसेच ५८५ विविध आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये एकूण ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. PCMC

तपासणी पथकाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून एकूण १ लाख १ हजार १९५ घरे तसेच २८० बांधकामांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण १ हजार ४५० घरांमध्ये डासांच्या आळ्या आढळल्या.

तसेच या पाहणीदरम्यान २८२ टायर, पंक्चर भंगारांची दुकाने, ४ लाख ७४ हजार ४० कंटेनर्सचीही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ हजार ४५४ कंटेनर्समध्ये डासांच्या आळ्या आढळल्या होत्या. या ठिकाणी योग्य ती डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.

डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट न केल्यास कठोर कारवाई केली जाईल

औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डासोत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. तसेच शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामांच्या ठिकाणी महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले असून त्या भागांची तपासणी करून संबंधितांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. शिवाय अशी ठिकाणे आढळून आलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नागरिकांनी वेळोवेळी घरातील साधनांची तपासणी करणे आवश्यक

घराच्या आत आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रीज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अशा साधनांची नागरिकांनी नियमितपणे तपासणी करणे देखील आवश्यक आहे. pcmc

महापालिकेच्या रुग्णालयांत तसेच दवाखान्यांमध्ये डेंगूच्या तपासणीकरिता रॅपिड किट उपलब्ध

महापालिकेच्या रुग्णालयांत तसेच दवाखान्यांमध्ये डेंगूच्या तपासणीकरिता आवश्यक असलेले रॅपिड किट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. किटकजन्य रोग नियंत्रणासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी तपासणी पथकांची नेमणूक करून डासांच्या आळ्या आढळून आलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

महापालिकेच्या तपासणी पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे

पावसाळ्यात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरू नयेत म्हणून महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधक मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी पथकातील कर्मचारी तपासणीसाठी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे.

यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग

संबंधित लेख

लोकप्रिय