Saturday, June 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आयुक्त राहुल महिवाल यांनी आषाढीवारी पालखी व्यवस्थापन आढावा घेतला

PCMC : आयुक्त राहुल महिवाल यांनी आषाढीवारी पालखी व्यवस्थापन आढावा घेतला

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका उत्सुक असून प्रत्यक्ष पालखी शहरात दाखल झाल्यानंतर ज्या विभागप्रमुखांना जबाबदारी सोपविली आहे त्यांनी ती चोखपणे पार पाडावी. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून संपुर्ण कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली सर्वांच्या समन्वयाने व्यवस्थित पार पाडण्याच्या सूचना आयुक्त राहूल महिवाल यांनी दिल्या. PCMC

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांकरिता पुरविण्यात येणा-या विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राहुल महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी आयुक्त महिवाल बोलत होते. pcmc news

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, निलेश भदाणे, अण्णा बोदडे, तानाजी नरळे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे, पंकज पाटील, सुषमा शिंदे, मुकेश कोळप, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, उमेश ढाकणे, सिताराम बहुरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या वतीने इंसिडंट कमांडर यांच्या अधिपत्याखाली शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक नेमले आहे. या पथकांना आपसांत संपर्क साधण्यासाठी आणि तात्काळ प्रतिसाद देऊन आपात्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वायरलेस यंत्रणा दिली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली. तसेच दोनही पालखी सोहळ्यांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर राहणार असून स्वागताच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. pcmc

या यंत्रणा हाताळणाऱ्या पथकांनी पोलीस यंत्रणेशी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी, अशा सूचनाही राहूल महिवाल यांनी दिल्या.

पालखी मार्गावर अथवा पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अनधिकृत बॅनर, होर्डिंग आणि दुकानांवर अतिक्रमण पथकाद्वारे त्वरित कारवाई करावी, पालखी सोहळा शहरात असताना मोकाट जनावरांमुळे कोणतीही बाधा निर्माण होणार नाही यासाठी अधिक पथके नेमून कारवाई करावी, पालखी मार्गावर स्वतंत्र पथकाद्वारे सातत्याने पाहणी करून खड्डे बुजविणे, ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी त्वरित पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, पालखी मुक्कामाच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करावी, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, निवासाच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी समन्वयाने कामकाज करावे, वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना देखील महिवाल यांनी यावेळी दिल्या.

दिंड्यांच्या निवासासाठी २१ शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याठिकाणी पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, शौचालय, न्हाणीघर अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दिंडी प्रमुखांना देशी झाडांच्या बिया, वैद्यकीय प्रथमोपचार पेटी, कापडी पिशव्या आणि संपर्क माहिती पुस्तिकेचे वाटप देखील यावेळी केले जाणार आहे. यासह दिंडी प्रमुखांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार केला जाणार आहे. pcmc

तसेच पालखी मार्गावर निश्चित केलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.

इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. इंद्रायणी नदीपात्रात इतर भागातून वाहून आलेली जलपर्णी तात्काळ हटविण्यासाठी स्वतंत्र पथक नेमणूक करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

यावर्षी महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याकरिता १ हजार २५ फिरते शौचालय तर ४७३ तात्पुरते स्नानगृह उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याठिकाणी स्वच्छतेकामी पुर्णवेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना आयुक्त महिवाल यांनी यावेळी दिल्या. पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी २० हजार सॅनिटरी नॅपकीन पॅड उपलब्ध करून दिले जाणार असून महापालिकेच्या या सर्व सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध असतील त्याबाबत माहिती देण्यासाठी दिशादर्शक फलक देखील लावण्यात येणार आहेत, अशी माहिती राहुल महिवाल यांनी बैठकीत दिली.

दरम्यान, आषाढीवारी पालखी सोहळा २०२४ च्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी सोहळा २०२४ संपर्क क्रमांक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या संपर्क पुस्तिकेमध्ये आपत्ती, वैद्यकीय, आरोग्य, सुरक्षा, पोलीस यंत्रणा, अग्निशमन तसेच इतर महत्वाच्या विभागांचे संपर्क क्रमांक आणि पालखी मार्ग नकाशा आदी अनुषंगिक माहिती सविस्तर देण्यात आली आहे. या संपर्क पुस्तिकेचे प्रकाशन देखील आज झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय