परिसरातील १० हजार रहिवाशांसह वाहनचालकांना दिलासा PCMC
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पुणे- नाशिक महामार्गावरील भोसरी – सदगुरूनगर येथे मुख्य रस्त्याला सेवा रस्ता नव्हता. धोकादायक रस्ता दुभाजकामुळे १०० मीटर पेक्षा जास्त अंतराच्या पट्टयात वाहतूक समस्या, अपघाताच्या घटना नित्त्याच्या झाल्या होत्या. या प्रश्नाकडे वाहतूक पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, आवश्यक असलेल्या सेवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. PCMC
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघात ‘‘वाहतूक कोंडीमुक्त भोसरी मतदार संघ’’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वाहतूक पोलीस, महापालिका, एमआयडीसी, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून वाहतूक संबंधित समस्या मार्गी लावण्यात येत आहेत. तसेच, मतदार संघातील वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण ‘रेड स्पॉट’ निश्चित केले असून, त्यावर कालबद्ध उपाययोजना केल्या जात आहेत. pcmc news
दरम्यान, सदगुरूनगर- भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध नव्हता. अवघ्या १०० मीटर पेक्षा जास्त अंतराच्या या पट्टयामध्ये वाहतूक विस्कळीत होत असे आणि रोजच्या अपघाताच्या घटनाही वाढल्या होत्या.
त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमधून सदर सेवा रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. यावर तात्काळ कार्यवाही करीत आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या पुढाकाराने सेवा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, माजी नगरसेविका सारिका लांडगे, माजी नगरसेवक सागर गवळी, योगेश लांडगे, संतोष लांडगे, नवनाथ लांडगे, सतीश लांडगे, अनिल लांडगे, धनाजी लांडगे, बाळासाहेब रेटवडे, खंडू मांदळे, रामदास चव्हाण, सोपान शिंदे, सचिन चव्हाण, पुंडलिक मोकाशी, अजिंक्य नेहेरे, मयूर नेहरे, पोपट लिंबोरे, अनिकेत भोंगळे, सुरेश थोरात, सोमनाथ मोहिते यांच्यासह स्थानिक नागरिक व रहिवाशी उपस्थित होते. या कामामुळे परिसरातील सुमारे १० हजाराहून अधिक स्थानिक नागरिक, वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
प्रतिक्रिया :
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. सदगुरूनगर येथील भागात सेवा रस्ता उपलब्ध नसल्यामुळे आणि धोकादायक रस्ता दुभाजकामुळे रहिवाशी भागातून मुख्य रस्त्यावर येणारी वाहने आणि मुख्य रस्त्यावरुन सदरगुरूनगरकडे वळणारी वाहने याचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी सदर सेवा रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत सूचवले होते. त्याची तात्काळ कार्यवाही सुरू झाली असून, लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.