Sunday, November 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : स्थायी समिती आणि महापालिका सभा बैठकीत विविध विषयांना मंजुरी

PCMC : स्थायी समिती आणि महापालिका सभा बैठकीत विविध विषयांना मंजुरी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपीएमएल) खरेदी करण्यात येणाऱ्या ४० सीएनजी बसेससाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अदा करावयाच्या रक्कम तसेच अनौपचारिक पर्यावरण शिक्षण प्रकल्पातून पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित करणे या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. (PCMC)

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. (PCMC)

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्यामार्फत पीएमपीएमएलसाठी १०० इलेक्ट्रीक बसेस आणि १०० सीएनजी बसेस खरेदी करण्यात येणार आहे.

त्यासाठी पुणे महापालिका ६० टक्के आणि पिंपरी चिंचवड महापालिका ४० टक्के हिस्सा भरणार आहे. त्यानुषंगाने खरेदी करावयाच्या १०० सीएनजी बसेस पैकी ४० बसेससाठी येणारा खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरणार आहे. या बसेसच्या खरेदीसाठी येणाऱ्या २७.२० कोटी रुपये रक्कम पीएमपीएमएल यांना अदा करण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करून त्यांच्यात पर्यावरण संवर्धन करण्याची आवड निर्माण करण्यासाठी तसेच महापालिकेच्या शाळांचे नावलौकिक करण्यासाठी महापालिकेच्या वतीने “अनौपचारिक पर्यावरण शिक्षण प्रकल्पातून पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित करणे” हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२४ या ३ महिन्याच्या कालावधीत या प्रकल्पातील ३ उपक्रम महापालिकेच्या १०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहेत.

हे कार्यक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक शिक्षणातील अनुभव, निसर्ग वाचन, सभोवतालचे पर्यावरण, पर्यावरणपूरक जीवन शैली याबाबत सजग करणारे आहेत. हा उपक्रम निसर्ग जागर प्रतिष्ठान,पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या उपक्रमच्या अनुषंगाने येणाऱ्या ९ लाख ६० हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.

बैठकीत मंजूर झालेले विविध विषय

पिंपरी येथे प्रभाग क्र. १० मध्ये सुविधा भूखंड विकसित करणे, लांडेवाडी येथे नव्याने होणाऱ्या संपवर पंपिंग मशिनरी बसवणे आणि अनुषंगिक यंत्रणेची कामे करणे, प्रभाग क्र. २५ ताथवडे येथील जीवननगर कडून मुंबई-बँगलोर कडे जाणाऱ्या २४ मी. रुंद डीपी रस्ता विकसित करणे आणि या कामाचा सिओइपी तांत्रिक विद्यापीठ (COEP TECHNOLOGICAL UNIVERSITY) मार्फत तपासणी करणे, शहरात विविध ठिकाणी सर्व्हेलन्सआ, स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट, स्मार्ट सिक्युरिटी सोल्युशन, स्मार्ट टेलिफोनी, बिल्डींग मॅनेजमेंट, आदी कामांसाठी सल्लागार नेमणूक करणे, शहरातील विविध भागातील रस्ते व फुटपाथ आणि इतर स्थापत्य सुधारणा विषयक कामे करणे आदी विषयांना प्रशासक सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय