विद्यार्थ्यांनी कलागुणांमध्येही प्राविण्य मिळवावे : डॉ. पराग काळकर (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : वेगवेगळ्या कलागुणांच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपल्या अंगीभूत कला सादर करून स्वतःला व्यक्त केले व सहभाग घेतल्याचा आनंद अनुभवला. या आनंदमधूनच या पुढेही विध्यार्थ्यांनी कलागुणांमध्ये प्राविण्य मिळवावे असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले. (PCMC)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळातर्फे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल्लोष 2024 युवक महोत्सव’ विभागीय अंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ पराग काळकर हे उपस्थित होते.
पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक सदानंद भोसले, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, बीएडच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, स्पर्धेचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. रोहित आकोलकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ज्योती इंगळे उपस्थित होते. (PCMC)
प्रमुख पाहुण्यांचे सत्कार खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.
जल्लोष २०२४ युवक महोत्सवात विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पिंपरी चिंचवड, मावळ, खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यातील 57 महाविद्यालयातील 1159 विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन, तालवाद्य, स्वरवाद्य, सुगम संगीत, भारतीय व पाश्चात्य समूह गान, एकांकिका, लोकनृत्य, मूकनाट्य, रांगोळी, मेहंदी, पथनाट्य, भित्तिपत्र, माती कला अशा 27 कला प्रकारात स्पर्धेत सहभाग नोंदविला.
विविध कला प्रकारात सर्वाधिक 56 सांघिक गुण पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाने पटकावून विजेता संघ ठरला. तर; 38 गुण सामायिक गुण मिळाल्यामुळे विभागून चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज आणि पुणे येथील सरहद्द कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयांना विजेता संघ ठरल्याने त्यांना चषक देण्यात आले. त्यांच्या समवेत विविध २७ कला प्रकारातील विजेत्यांना, भव्य मेडल व प्रशस्तीपत्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, खजिनदार डॉ. भूपाली शहा प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी परीक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा आपल्या मनोगतात म्हणाल्या, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी सन 2007 ही शिक्षण संस्था सुरू केली. त्यावेळी केवळ 19 विद्यार्थी होते.
अथक परिश्रम व गुणवत्तेच्या जोरावर आज विविध प्रकारच्या शाखा व व्यावसायिक अभ्यासक्रमात सुमारे 8000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तज्ञ प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग देखील प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. आजच्या स्पर्धेत कुणीही जिंकले व हरले हे महत्त्वाचे नसून सहभाग नोंदवून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला हे महत्त्वाचे आहे. ज्यांना यश मिळाले त्यांचे अभिनंदन ज्यांना यश मिळाले नाही, त्यांनी ना-उमेद न होता, झालेला चुकांची पुनरावृत्ती टाळून सकारात्मक दृष्टीने पुढील वर्षी तयारी करून सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी केले.
प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळुंज यांनी आपल्या प्रस्ताविकात म्हणाले, यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयाला आजच्या स्पर्धेचे यजमान पद दिले. याबद्दल आभार मानून विविध स्पर्धेत पाच तालुक्यातील ५७ महाविद्यालयाने स्पर्धेत सहभाग नोंदविला, त्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळच्या सत्रात कमला एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र कांकरिया, रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. नितीन घोरपडे, यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रुती गणपुले यांनी केले. बक्षीस वाचन स्वामीराज भिसे यांनी तर आभार प्रा. ज्योती इंगळे यांनी मानले.