Wednesday, December 18, 2024
HomeNewsPCMC:चिंचवड मतदारसंघातील ४०० रामभक्त अयोध्येकडे रवाना

PCMC:चिंचवड मतदारसंघातील ४०० रामभक्त अयोध्येकडे रवाना

मोदी सरकारमुळे मंदिराचे स्वप्न साकार झाल्याचा शंकर जगताप यांचा दावा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. तेव्हापासून अयोध्येत रामभक्तांची रीघ लागली आहे. शनिवारी (दि. १०) भाजपाच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ४०० रामभक्तांना घेऊन रेल्वे अयोध्येकडे रवाना करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड ते लोणावळापर्यंत ‘राममय’ झाले होते. ‘प्रभू श्री राम की जय’, ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत  चिंचवड मतदारसंघातील नागरिक रेल्वेद्वारे अयोध्येला रवाना झाले. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर रामभक्त अयोध्येकडे मार्गस्थ झाले.


यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “देशात मोदी सरकार आल्यामुळेच राम मंदिराचे स्वप्न साकार झाले. २००८ आणि २०११ साली प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता. तेव्हा श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागितले असता, काँग्रेसच्या वकिलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर रामजन्मभूमीचे पुरावे दिले गेले आणि राम मंदिर साकारायला परवानगी मिळाली.”

यावेळी मा.नगरसेवक श्री.आप्पा बागल, श्री.रघुवीर शेलार, निमंत्रित सदस्य श्री.संतोष कलाटे, निवडणूक प्रमुख पिंपरी विधानसभा श्री.अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते श्री.सखाराम रेडेकर, श्री नितीन इंगवले,श्री.रमेश काशीद,श्री.गणेश लंगोटे, लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ कलाक्रीडा अकादमी चे अध्यक्ष श्री.माऊली जगताप, श्री.मिलिंद कंक आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय