नाशिक : फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडून गरीब आदिवासी जनतेला वारंवार धमकावले जाते आहे, तसेच जीवघेणा त्रास दिला जात आहे. ही गोष्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा कदापी सहन करनार नाही. प्लॉट धारकांना जर अधिकाऱ्यांनी त्रास दिला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दमही माजी आमदार कॉ.जे.पी. गावीत यांनी दिला. आपल्या हक्काच्या आणि ताब्यात असलेल्या वनजमिनीचा प्लॉट देण्यास सरकार टाळाटाळ करीत असेल तर येणाऱ्या काळात किसान सभा मोठे आंदोलन छेडणार, वेळ प्रसंग किसान लाँग मार्च ची पुनरावृत्ती करणार असा इशारा गावीत यांनी सरकारला दिला.
चांदवड येथे हजारो वनजमीन धारकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी गावित बोलत होते. तसेच जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा कमिटी सदस्या नंदाबाई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित अडीच हजार प्लॉट धारकांनी फॉरेस्ट प्लॉट साठी पुन्हा एकदा लाँग मार्च चे आंदोलन काढावे, यासाठी तयार असल्याचे सांगितले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नागपुरात होणार !
यावेळी गावित म्हणाले, 2005 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 61 खाजदारांनी काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला. त्यावेळी वनजमीन कायदा मंजुर करा, अशी अट घालण्यात आली. ती अट मान्य करत काँग्रेस सरकारकडून वनजमीन कायदा मंजुर करून घेतला. माञ आज जवळजवळ सतरा वर्ष झाली परंतू राज्य सरकार या कायद्याने दिलेला अधिकार आणि हक्क हिसकावून घेत आहे. आपले हक्काचे फॉरेस्ट प्लॉट आपल्या नावावर करून देत नाही. आपल्या ताब्यातील कसत असलेली जमीन न देता अतिशय कमी जमीन देऊन आपली फसवणूक करत आहेत. दोनशे दोनशे लोकांचा सामुदायिक सातबारा देऊन आपली फसवणूक करत आहे. तसेच वनजमिनीच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन वन विभाग अशी नोंद करून आपली दिशाभूल करीत आहे. ही बाब खूप गंभीर आहे, आपण वनजमिनित काढलेल्या विहिरी बुजून दिल्या जात आहेत, शेती उध्वस्त केली जात आहे, बांधलेली घरे पाडून लोकांचे संसार उघड्यावर पाडले जात आहेत, असा गंभीर आरोप सरकारवर केला.
यावेळी किसान सभा राज्य कमिटी सदस्य तथा माकप चे जिल्हा कमिटी सदस्य हनुमंत गुंजाळ, आणि धर्मराज शिंदे यांनी उपस्थित चांदवड तालुक्यातील वनजमिन धारक नागरिकांना आवाहन करतांना म्हटले की, पिढ्यान् पिढ्या आपण कसत असलेली आणि आपल्या ताब्यात असलेली फॉरेस्ट ची जमीन हि आपल्या हक्काची आहे, यावर फक्त आपलाच अधिकार आहे. फॉरेस्ट अधिकारी आपल्याला धमकावतात, दादागिरी करतात परंतू या भीतीला न घाबरता आपण किसान सभा आणि माकप च्या इतर संघटना मजबूत करुन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संघटन उभे करून फॉरेस्टर आणि शासनाशी दोन हात करावे लागतील. तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रखर आंदोलने करावे लागतील, यासाठी तालुक्यातील सर्व लाभधारक कुटुंबातील सदस्यांनी पक्ष हाक देईल तेव्हा संघर्ष करण्यास तयार राहावे असे सांगितले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेची तीव्र निदर्शने
यावेळी चांदवड तालुका माकप सेक्रेटरी गणपत गुंजाळ, सारिका मोरे, तुकाराम गायकवाड, सय्यद, राजाराम ठाकरे, त्रंबक ठाकरे, शांताराम दळवी, राजाराम अहिरे, मधुकर मोरे यांच्यास डीवायएफआय, किसान सभा, जनवादी महिला संघटना यांचे पदाधिकारी आणि चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव येथिल कार्यकर्ते आणि चांदवड तालुक्यातील हजारो प्लॉट धारक उपस्थित होते.