Monday, December 23, 2024
Homeनोकरी...आता लिपिक संवर्गातील पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार !

…आता लिपिक संवर्गातील पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार !


मुंबई
: राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, श्रीमती गीता कुलकर्णी, श्रीमती सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे आदी यावेळी उपस्थित होते.

भरणे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया स्थानिक पातळीवर होते. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागल्याने खर्च वाढतो.

भरणे पुढे म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी उमेदवारांकडून येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सर्वच गट ब आणि गट क संवर्गातील पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून राबविता येईल काय याबाबत चाचपणी करण्यात येईल. तथापि, प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास वाचू शकेल, असेही ते म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांच्या अनुषंगाने बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली होती. या बैठकीमध्ये एमपीएससी मुख्यालयाच्या बेलापूर येथील प्रस्तावित इमारत उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरच या इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी आणि नियुक्तीप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया गतीने पार पाडण्यासाठी सदस्यांची सर्व पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे, असे भरणे म्हणाले. मंत्रालयीन संवर्गातील प्रलंबित पदोन्नत्यांच्या अनुषंगानेही त्वरीत कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.

संबंधित लेख

लोकप्रिय