रत्नागिरी, दि. 12 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 7 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केली. मंडणगड तालुक्यातील डॉ.आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की, 6 डिसेंबर हा डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 सालापासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. कारण याच दिवशी 1900 साली बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणास सुरूवात केली होती. मला असे वाटते की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रीय पातळीवरील डॉ.आंबेडकरांच्या शिक्षण विषयक ओढ आणि निष्ठेचे स्मरण करुन देण्यासाठी तो साजरा करणे आवश्यक आहे. येथे बसलेल्या संसदेतील सदस्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, मी त्यांना माझ्या परीने मदत करीन, असे ते राष्ट्रपती म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी संबधित पाच ठिकाणांना पंचतीर्थाचे नाव देऊन केंद्र सरकारने या सर्व ठिकाणी आदंराजली अर्पण करण्याची स्तुत्य पध्दत सुरु केली आहे. त्यांची जन्मभूमी, नागपूरची दीक्षा भूमी, दिल्लीचे परिनिर्वाण स्थळ, मुंबईची चैत्यभूमी आणि लंडन मधील आंबेडकर मेमोरियल होम या पाच ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्श मानणारे लोक श्रध्दाजंली अर्पण करतात. माझी केंद्र सरकरला अशी सूचना आहे की, याच मालिकेत बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथील स्मारकही तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामाभिधान करण्यात यावे.
याप्रसंगी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मोठा व्यासंग केला. आजच्या पिढीतही ही प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी उत्तमोत्तम पुस्तके असलेले ग्रंथालय निर्माण करण्याची सूचना राष्ट्रपती कोविंद यांनी आताच स्मारकाला भेट दिली तेव्हा केली आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सहकार्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या उपक्रमामध्ये मी ही सहभागी होऊ इच्छिृतो. त्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यपाल विवेकानुदान निधीतून 30 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
यावेळी राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते हे व्यासपीठावर उपस्थित होते.