मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) सध्या त्यांच्या आगामी ‘खाशाबा’ (Khashaba) या सिनेमामुळे चर्चेत आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी या सिनेमाची घोषणा केली असून आता या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे.
खेळांवर तसेच वेगवेगळ्या खेळांडूंवर आधारित असलेले अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरदेखील आपली जादू दाखवण्यात हे सिनेमे यशस्वी ठरले आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘खाशाबा’ हा सिनेमा क्रीडाविषयक सिनेमा आहे. पैलवान खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.
नाजराज मंजुळे यांनी ‘खाशाबा’ या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे”.
नागराज मंजुळे यांनी पुढे लिहिलं आहे,”फॅन्ड्री’, ‘सैराट’नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फॅन्ड्रीपासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल”.
नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर खाशाबा जाधव यांच्या फोटोची तडे पडलेली फ्रेम दिसत आहे. तसेच मेडलने त्यांचा चेहरा झाकलेला दिसत आहे. नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर खूप खूप शुभेच्छा अण्णा, चांगभलं, विषय हार्ड अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.